दररोज चोरीला जातात ९ वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:01 AM2018-07-23T02:01:51+5:302018-07-23T02:02:24+5:30

उघडकीस येण्याचे प्रमाण सर्वांत कमी

Daily stolen 9 vehicles | दररोज चोरीला जातात ९ वाहने

दररोज चोरीला जातात ९ वाहने

Next

पुणे : पुणे शहरातून दररोज सरासरी ९ वाहने चोरीला जात असून, त्या उघडकीस येण्याचे प्रमाण सर्व गुन्ह्यांमध्ये मात्र सर्वांत कमी आहे़ १ जानेवारीपासून ३० जूनअखरेपर्यंत १ हजार ५५२ वाहने चोरीला गेली आहेत़
सर्वसामान्य नागरिक गरज म्हणून वाहन खरेदी करतात़ प्रामुख्याने कर्ज घेऊन नागरिक स्वत:साठी अथवा आपली पत्नी, मुलांसाठी दुचाकी वाहने खरेदी करत असतात़ एक गरज म्हणून खरेदी केलेल्या हे वाहन चोरीला गेल्यावर त्यांची मोठी कुचंबणा होते़ पोलीस ठाण्याला गेल्यानंतर त्याला सर्वप्रथम दोन दिवस शोध घ्या, असा सल्ला दिला जातो़ त्यानंतर त्याने आग्रह केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येतो़ चोरीला गेलेल्या आपल्या वाहनाचा तपास लागावा अशी त्यांची अपेक्षा असते़ अनेकदा वाहन चोरीला जाण्यामध्ये काही अंशी त्यांचाही दोष असतो़ व्यवस्थित गाडी पार्क न करण्यापासून चावी गाडीलाच सोडून देणे, असे प्रकारही घडताना दिसत असतात़
या वर्षी जूनअखेर १५५२ वाहने चोरीला गेली असून, गेल्या वर्षी २०१७ मध्ये १४८६ वाहने चोरीला गेली होती़ तर,यंदा जून अखेर ३८० गुन्हे उघडकीस आले आहेत़ गेल्या वर्षी जूनअखेर ५११ गुन्हे उघडकीस आले होते़
याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले की, वाहनचोरी रोखण्यासाठी
आणि चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथक आहे़ वाहन चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जाते़ तसेच, नियमितपणे नाकाबंदीद्वारे संशयित वाहनांची तपासणी
करण्यात येते़

२०१७ वर्ष : ३ हजार १६९ वाहने चोरीला
२०१७ मध्ये संपूर्ण वर्षभरात ३ हजार १६९ वाहने चोरीला गेली होती़ त्यापैकी ९६३ गुन्हे उघडकीस आले असून, त्याचे प्रमाण २९ टक्के इतके आहे़ चोरी, घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे़ २०१६ मध्ये ३ हजार ७३ वाहने चोरीला गेली होती़ त्यातील ९९५ गुन्हे उघडकीस आले होते़ हे प्रमाण ३२ टक्के इतके होते़
वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी शहर पोलीस दलाकडून प्रयत्न केले जातात़ त्यात प्रामुख्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, दररोज नाकाबंदी करून संशयितांची वाहनांची तपासणी करणे, जेथे जुनी वाहने विकली जातात़ तेथे जाऊन वेळोवेळी तपासणी करून चोरीची वाहने विकली जात तर नाही ना, याकडे लक्ष ठेवले जाते़ अचानक चेकिंग केले जाते़ असे असले तरी, वाहनचोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून त्यात आता मोटारींच्या चोरीच्या घटना वाढत आहे़

Web Title: Daily stolen 9 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.