'उज्ज्वला'ची हूल... पोटाची आग शमवण्यासाठी अर्धं गावं आजही पेटवतं चूल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 02:46 PM2020-03-05T14:46:36+5:302020-03-05T17:21:59+5:30
७५ टक्के लोक ६ ते ७ किमी अंतरावर रानात जाऊन सरपण डोक्यावर आणतात
मोहन लांडे -
मढ : मढ आणि जुन्नर गावापासून केवळ दहा किमी अंतरावर असणाऱ्या मांगनेवाडी या गावातील २५ कुटुंबे सोडली तर इतर सर्वच कुटुंबीयांना महिलांना घरातील चूल पेटविण्यासाठी डोईवर सरपण घेऊन पायपीट करावी लागत आहे. स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटल्यावरही या गावात केवळ २५ घरांमध्ये गॅस कनेक्शन आले आहे, तर उर्वरित घरामध्ये चुलीचा धूर निघतो. या धुरात या गावाचा विकास अद्यापही हरवून गेलेला आहे. त्यामुळे टीचभर पोटाची भूक मिटविण्यासाठी येथील महिलांच्या डोईवर अजूनही सरपणाचा भार वाहावा लागतो.
जुन्नरच्या बाजूला गणेशखिंडीच्या पायथ्याशी सह्याद्री डोंगररांगेतील मांगणी डोंगराच्या कुशीत वसलेली ६५ ते ७० घरांची वस्ती म्हणजे मांगनेवाडी. आजही आदिवासी बांधवांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपली उपजीविका चालविण्यासाठी अजूनही ७५ टक्के लोक ६ ते ७ किमी अंतरावर रानात जाऊन वाळलेले सरपण डोक्यावर आणताना त्यांना जिवावर बेतणारी कसरत करावी लागत आहे. स्वत:च्या घराची जागा सोडली तर सर्वच कुटुंबे ही भूमिहीन आहेत.
शेतजमिनी नसल्याने मिळेल ते काम आणि मजुरी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. याशिवाय विशेष म्हणजे गावात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठीसुद्धा अडचण निर्माण होते. अंत्यविधीसाठी निश्चित जागा नसल्याने अनेकांच्या हातापाया पडून मृत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी खूप संघर्ष आणि यातना सहन कराव्या लागतात.
..............
सरपण आणताना पडल्याने महिलांचा गेला जीव
आदिवासी बांधवांच्या डोक्यावरील मोळी खाली कधी येणार, हादेखील आदिवासी भागातील एक ज्वलंत प्रश्न आहे. अनेक ठिकाणी आजही डोक्यावर सरपण वाहत आपली उपजीविका करण्याचे काम आदिवासी बांधवांना करावे लागत आहे.
मागील महिन्यात करंजाळे येथील महिला सीताबाई रोहिदास भांगले वय वर्षे ३६ सरपण आणण्यासाठी रानात गेली असता पाय घसरून पडली, डोक्यावरील मोळी अंगावर पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
........
शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचावेत
शासनाने सुरू केलेल्या योजनांचा लाभ खरोखरच गरजू लाभार्थ्यांना मिळतो का? किंवा त्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात का? पोहोचत असतील तर त्या कशा राबविल्या जातात? ग्रामपंचायतीला येणाºया निधीचा पुरेपूर उपयोग केला जातो का? हासुद्धा महत्त्वाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. म्हणून शासनाने वेळीच दखल घेऊन या समस्यांवर निश्चित उपाय शोधणे गरजेचे आहे, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. जो पर्यंत शासनाच्या योजना गरजूंपर्यत जाणार नाही तोपर्यंत महिलांच्या डोक्यावरील ओझ उतरणार नाही हेही निश्चित आहे.