दत्तजयंती सोहळ्यानिमित्त भक्तांची गर्दी
By admin | Published: December 25, 2015 01:58 AM2015-12-25T01:58:37+5:302015-12-25T01:58:37+5:30
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’ च्या गजरात आणि शेकडो भाविकांनी फुललेल्या दत्तमंदिरामध्ये दत्तजन्म सोहळा पार पडला.
पुणे : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’ च्या गजरात आणि शेकडो भाविकांनी फुललेल्या दत्तमंदिरामध्ये दत्तजन्म सोहळा पार पडला. हभप विजयबुवा अपामार्जने यांच्या कीर्तनानंतर झालेला नेत्रदीपक दत्तजन्म सोहळा डोळ्यांत साठविण्याकरिता भाविकांनी गर्दी केली. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर परिसर भक्तिमय झाला होता.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ०४ मिनिटांनी श्रीदत्तजन्म सोहळा झाला. पाळण्यावर पुष्पवृष्टी करून ‘दिगंबरा... दिगंबरा...’ असा जयघोष करण्यात आला. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते महाआरती झाली. दत्तगुरूंच्या पादुकांची पालखी नगरप्रदक्षिणा मंदिरातून वाजत-गाजत निघाली. नगरप्रदक्षिणेत सनई चौघडा, रथ, बँड, नादब्रह्म, ढोल-ताशा पथक, दत्तमहाराजांच्या पादुका ठेवलेला फुलांनी सजविलेला रथ पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होता. दत्तमंदिरापासून निघालेली पालखी रामेश्वर चौक, टिळक पुतळा मंडई, शनिपार, अप्पा बळवंत चौक, मजूर अड्डा, बुधवार पेठ मार्गे मंदिरात आली. मंदिराच्या पालखी मंडळातर्फे पालखीचे आयोजन केले गेले.
दत्तजयंतीनिमित्त गुरुवारी शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील दत्तमंदिरांमध्ये फुले व दिव्यांची सजावट करण्यात आली होती. तसेच अनेक ठिकाणी या उत्सवानिमित्त भजन, कीर्तन यांचेही आयोजन करण्यात आले होते. याबरोबरच अनेक ठिकाणी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टतर्फे पहाटे पाच वाजल्यापासून कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे मंदिराचे कार्यकारी विश्वस्त शिरीष मोहिते यांनी सांगितले. यानिमित्त अपामार्जने यांच्या कीर्तनाचेही आयोजन केले होते. सायंकाळी दत्तजन्म सोहळा पार पडला. ७ दिवसांपासून मंदिरामध्ये भजन व कीर्तनाचे आयोजन केले होते. सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये ढोल-ताशा पथक, बँड पथक, यांबरोबर नागरिकांनी सहभाग घेतला होता. कॅम्पमधील साचापीर स्ट्रीटवरील सूर्यमुखी दत्तमंदिरात देविप्रसाद जोशी यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली. भवानी पेठेतील दत्तगुरु माऊली प्रतिष्ठानतर्फे व सोमवार पेठेतील मित्र मंडळातर्फे या दिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.