लाखेवाडीत दलित कुटुंबावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2015 12:13 AM2015-06-28T00:13:24+5:302015-06-28T00:13:24+5:30

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील दलित कुटुंबीयांवर शेतजमीन व रस्त्याच्या जुन्या वादातून शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी सामूहिक प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Dalit family attacks in Lakhewadi | लाखेवाडीत दलित कुटुंबावर हल्ला

लाखेवाडीत दलित कुटुंबावर हल्ला

googlenewsNext

बावडा : इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील दलित कुटुंबीयांवर शेतजमीन व रस्त्याच्या जुन्या वादातून शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी सामूहिक प्राणघातक हल्ला करण्यात आला. विलास भिंगारदिवे यांच्या कुटुंबातील महिलांसह ११ जणांना जखमी करण्यात आले आहे. यापैकी तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी आरोपींवर अ‍ॅस्ट्रॉसिटीसह अन्य कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पाच मुख्य आरोपींसह १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एकाला तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी विलास भिंगारदिवे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी राजेंद्र उर्फ राजू बाळकृष्ण शिंगाडे, संजय बाळकृष्ण शिंगाडे, किरण दीपक खुरंगे, महादेव पांडुरंग खुरंगे, विलास पांडुरंग खुरंगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हल्ल्यात विलास रघुनाथ भिंगारदिवे (वय ५०), जानकी विलास भिंगारदिवे (वय ४५), रघुनाथ दादा भिंगारदिवे (वय ७०), दिलीप विलास भिंगारदिवे (वय १९), प्रदीप विलास भिंगारदिवे (वय २९), जया समाधान कांबळे (वय ३५), समाधान मल्हारी कांबळे (वय ४०), पुष्पा प्रदीप भिंगारदिवे (वय २५), तसेच तीन लहान बालके जखमी झाली आहेत. त्यांच्यावर बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहेत. तर, प्रदीप भिंगारदिवे, दिलीप भिंगारदिवे, समाधान भिंगारदिवे यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा हल्ला होत असताना भयभीत झालेल्या महिला व मुली घाबरून पळत असताना या हल्लेखोरांनी त्यांना मारहाण करून विनयभंग व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यात आरोपींनी लोखंडी खिळे ठोकलेली लाकडी दांडकी, लोखंडी पाईप, लोखंडी गजाचा वापर केला. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान, भिंगारदिवे कुटुंबीयांवर उपचार सुरू असताना संशयितांनी त्यांच्या घरालगतची स्वयंपाकाची झोपडी पेटवून दिली. यात त्यांचे प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,भिंगारदिवे वस्तीनजीक असलेल्या जमिनीत काही धनदांडग्यांनी अतिक्रमण केल्याच्या कारणावरून विलास भिंगारदिवे यांचा किरण खुरंगे व राजेंद्र शिंगाडे यांच्याशी वाद होता. त्यातूनच ही दुर्घटना घडली.
(वार्ताहर)

घटनेच्या निषेधार्थ
रास्ता रोको आंदोलन..
-या घटनेच्या निषेधार्थ लाखेवाडी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर, इंदापूर पोलीस ठाण्यासमोर पुणे-सोलापूर महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच, बावडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनादेखील सहआरोपी करून निलंबित करावे, अशी मागणी करुन त्यांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला.
-या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांनी या गुन्ह्याचा नि:पक्षपातीपणे तपास करुन आरोपींना लवकरच अटक करु, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
-उपविभागीय पोलीस अधिकारी मोरे यांच्यासह इंदापूरचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. गावात तणावपूर्ण वातावरण आहे. भिंगारदिवे वस्तीवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

..तर आजचा अन्याय
झाला नसता
-भिंगारदिवे वस्तीपासून नीरा भीमा ते लाखेवाडी जाणारा पाणंद रस्ता अडविण्यात आला आहे. त्यामुळे भिंगारदिवे कुटुंबाची मोठी गळचेपी झाली होती. याबाबत बावडा पोलिसांकडे, इंदापूर तहसील विभागाकडे तक्रार करुनदेखील दखल घेण्यात आली नाही. काही महिन्यांपूर्वी भिंगारदिवे यांच्या आई यांचा मृत्यू झाला. त्या वेळी अंत्ययात्रा या रस्त्याने अडवण्यात आली होती. तसेच, त्यांच्या मुलीच्या लग्नातदेखील धनदांडग्यांनी अडवणूक केली होती.पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्याकडे भिंगारदिवे यांनी वारंवार तक्रार करुनही त्यांनी आरोपींना पाठीशी घातले. त्यांनी वेळीच दखल न घेतली असती, तर अन्याय झाला नसता, अशी प्रतिक्रिया भिंगारदिवे यांनी व्यक्त केली.

Web Title: Dalit family attacks in Lakhewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.