दलित कुटुंबास जबरी मारहाण
By admin | Published: December 30, 2014 10:52 PM2014-12-30T22:52:28+5:302014-12-30T22:52:28+5:30
इंदापूर पोलीस ठाण्यात दलित कुटुंबाला जबर मारहाण केल्या प्रकरणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हा दाखल झाला आहे.
इंदापूर : निमगाव केतकी येथील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या आजी माजी सरपंचांसह १२ जणांवर शनिवारी (दि. २७ डिसेंबर) इंदापूर पोलीस ठाण्यात दलित कुटुंबाला जबर मारहाण केल्या प्रकरणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हा दाखल झाला आहे.
पंचायत समितीचे माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य विद्यमान सरपंच अंकुश जाधव, माजी सरपंच, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराज जाधव, निखील खराडे, शिवाजी भोंग, बबन जाधव, अमोल जाधव, तुषार जाधव, वैभव जाधव, सचिन जाधव, सागर चांदणे, बबलू जाधव, त्याचे वडील, त्याचे चुलते (सर्व रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
या संदर्भात पंकज सुभाष मिसाळ (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) याने फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांनी सांगितले की, निमगाव केतकीच्या यात्रेत फिर्यादी व बबलू जाधव यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी बबलू जाधवने फिर्यादीस स्मशानाकडे ये, नाही तर गावात राहू नको, अशी धमकी दिली होती.
दि. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे सर्व आरोपी फिर्यादीच्या घरात घुसले. हातातील कोयत्याने फिर्यादीच्या आईच्या डोक्यात वार केले, अशी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. के. नाळे पुढील तपास करत आहेत.
(वार्ताहर)
ज्या ठिकाणी घटना घडली त्या वेळी आम्ही त्या ठिकाणी नव्हतो. आम्ही गावातील प्रमुख पदांवर कार्यरत असल्याने आम्हाला बदनाम करण्यासाठी या प्रकरणात आमची नावे घेण्यात आली आहे.
- देवराज जाधव,
जिल्हा परिषद सदस्य