दलितांना राजकीय नेतृत्वापासून ठेवले वंचित - गोऱ्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 02:15 AM2018-08-26T02:15:22+5:302018-08-26T02:15:50+5:30
डॉ. नीलम गोऱ्हे : जातिव्यवस्थेच्या चौकटीत अडकविले
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीवर वाटचाल करणाऱ्या दलित समाजातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मेहनत घेण्याची क्षमता आहे. समपर्ण आणि एकनिष्ठेमुळे राजकीय क्षेत्रात येऊन उत्तम उदाहरणे घालून दिली असती, परंतु प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने त्यांना जातीच्या चौकटीत अडकवून ठेवत त्यांच्यातील राजकीय नेतृत्व उमलूच दिले नाही, अशी खंत विधान परिषदेच्या प्रतोद आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी शनिवारी व्यक्त केली.
आडकर फौंडेशन आणि श्यामची आई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा धम्मक्रांती पुरस्कार यंदा महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून दलाईलामा यांचे शिष्य भन्ते राजरतन आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर होते.
डॉ. गोºहे म्हणाल्या, प्रत्येकाचे आपले वेगळ एक राजकारण असते परंतु महाराष्ट्र आणि देशाच्या भल्यापुढे कोणतेच राजकारण करु नये. अलीकडे सभोवताली पाहिले तर जातीयतेची तेढ वाढविणारे कारखाने तयार झाले आहेत की काय अशी शंका येते. समाजातील हिंसात्मक वृत्ती वाढत चालली आहे. धुळे जिल्ह्यात घडलेली घटना त्याचे जिवंत उदाहरण आहे. अॅड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्यामची आई फौंडेशनचे भारत देसडला यांनी आभार मानले. कवी उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.