गोळीबार करत साडेतीन कोटींच्या रकमेवर मारला डल्ला; पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 09:07 PM2022-08-26T21:07:44+5:302022-08-26T21:07:53+5:30
सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून इंदापूर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरकुटे बुद्रुक गावच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे सहाजणांनी चारचाकीवर गोळीबार करत गाडीतील साडेतीन कोटींची रोकड लुटल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून इंदापूर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भावेशकुमार अमृत पटेल (वय ४०, मूळ रा. कहोडा, ता. उंझा, जि. मेहेसाना, गुजरात, सध्या रा. पंचरत्न बिल्डिंग, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पटेल हे आपल्या माेटारीतून ( क्र.टी.एस.०९ ई.एम. ५४१७) पुणेसोलापूर-राष्ट्रीय महामार्गावरुन पुण्याकडे जात होते. त्यावेळी वरकुटे बुद्रुक गावाच्या हद्दीत वरकुटे पाटीजवळच्या गतिरोधकाजवळ गाडीची गती कमी झाल्यानंतर पायी चालत आलेल्या चार अज्ञात इसमांनी हातातील लोखंडी टॉमी दाखवत फिर्यादीला गाडी थांबवण्यास सांगितले. त्यामुळे फिर्यादीने गाडीचा वेग वाढवला. हे पाहून त्या चोरट्यांनी दुसऱ्या कारमधून पटेल यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. फिर्यादी गाडी थांबवत नाही,असे दिसल्यानंतर त्याच्या गाडीवर गोळीबार करत त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडवली. गाडीतून उतरलेल्या चार चोरट्यांनी फिर्यादी व त्याच्या सहकाऱ्याला हाताने मारहाण केली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या गाडीमधील ३ कोटी ६० लाख रुपये, फिर्यादी जवळचे १४ हजार रुपये व १२ हजार रुपये किमतीचे व्हिओ कंपनीचे दोन मोबाईल असा एकूण ३ कोटी ६० लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरम्यानच्या काळात आणखी दोन अज्ञात चोरटे गाडीत बसले होते. दरम्यान, पटेल यांच्याकडे एवढी रक्कम कोठून आली. ते कोठे निघाले होते. याबाबत अद्यापर्यंत कोणीतीही माहिती मिळाली नाही.