डेमू लोकलचे दौंडला ढोलताशांनी जंगी स्वागत

By admin | Published: March 26, 2017 01:41 AM2017-03-26T01:41:19+5:302017-03-26T01:41:19+5:30

अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी असलेल्या लोकलच्या जागी डिझेल मल्टिपल युनिट (डेमू) ही गाडी अखेर

Dalmatan's Daund to give a welcome welcome | डेमू लोकलचे दौंडला ढोलताशांनी जंगी स्वागत

डेमू लोकलचे दौंडला ढोलताशांनी जंगी स्वागत

Next

पुणे/दौंड : अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी असलेल्या लोकलच्या जागी डिझेल मल्टिपल युनिट (डेमू) ही गाडी अखेर शनिवारी प्रवाशांना घेऊन धावली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘डेमू’ला हिरवा झेंडा दाखविला.
पुणे रेल्वे स्थानकातून महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, अमर साबळे यांनी हिरवा झेंडा दाखविला. रेल्वे व्यवस्थापक गुरूराज सोना तसेच प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर मुक्ता टिळक यांनी पुणे-दौंड मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाल्याचे सांगितले. तसेच प्रवाशांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासनही दिले. दौंड रेल्वे स्थानकात डेमू लोकलचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
स्वागतासाठी रेल्वे स्थानकात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी ४ च्या सुमारास या गाडीचे फलाट क्र. २ वर आगमन झाले. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशे आणि पोलीस बँड पथकामुळे अवघा परिसर दुमदुमून गेला.
खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी पुणे ते दौंड या लोकलमधून इंजिनातून प्रवास केला. दौंड स्टेशन प्रबंधक एस. एन. सिंग यांच्यासह रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सुळे म्हणाल्या, की लोकल सुरू होण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे मी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आज ही रेल्वे सुरू झालेली आहे.
थोरात म्हणाले, की आमदार असताना लोकल सुरू होण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मी सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वेमंत्र्यांना निवेदने दिली. आज लोकल सुरू झाली, ही आनंदाची बाब आहे.
या प्रसंगी नगराध्यक्षा शीतल कटारिया, सभापती मीना धायगुडे, उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, गुरुमुख नारंग, वीरधवल जगदाळे, अ‍ॅड. अजित बलदोटा, विकास कदम, नितीन दोरगे, महेश भागवत, सत्त्वशील शितोळे, सोहेल खान, गणेश पवार, सचिन गायकवाड, प्रशांत धनवे, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच, भाजपाचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनीदेखील डेमू लोकलचे स्वागत करून पेढे वाटले.
या कार्यक्रमात सतत अर्ज व मागण्या यांच्याद्वारे पाठपुरावा करणारे केडगाव, पुणे, दौंड रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी दुर्लक्षित झाल्याने नाराज असल्याचे जाणवत होते.


कडेठाणला डेमू लोकलचे स्वागत

वरवंड : पुणे-दौंड डेमू लोकलचे कडेठाण रेल्वे स्थानकात मोठ्या जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले.
अनेक वर्षांपासून लोकलचे स्वप्न या भागातील ग्रामस्थ पाहत होते. मात्र, हे स्वप्न प्रत्यक्षात साकारल्याने ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण आहे. या लोकलमुळे प्रवाशांचा प्रवासात जात असलेला वेळ वाचणार आहे. तसेच, या रेल्वेने नोकरदारवर्ग, विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने प्रवास करताना दिसत असतात. या लोकल चालू झाल्यामुळे पालकवर्ग व नोकरदारवर्ग यांनी समाधान व्यक्त केले.ही पुणे-दौंड डेमू लोकल कडेठाण येथे आल्यानंतर गाडीचे स्वागत नारळ व हार घालून करण्यात आले.

संस्मरणीय प्रवास

 केडगांव : पुणे ते दौंड प्रवासाचा मंतरलेला ९० मिनिटांचा प्रवास दौंडकरांसाठी संस्मरणीय होता. हाराफुलांनी सजवलेल्या गाडीत प्रवासी, पदाधिकारी, तिकीट तपासनीस व पोलीस या गाडीमध्ये प्रवासाचा अनुभव घेत होते. विशेष म्हणजे, गाडीमध्ये तिकीट तपासनीस असूनसुद्धा प्रवाशांची तपासणी करीत नव्हते.
४हडपसर, मांजरी बुद्रुक, लोणी काळभोर, ऊरुळी कांचन, यवत येथे प्रवासी व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. गाडीमध्ये राष्ट्रवादी जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी लाडू वाटून जल्लोष साजरा केला. केडगाव येथे अडीच तास वाट पाहणाऱ्या हजारो नागरिकांचा हिरमोड झाला. कारण गाडी फक्त ३ मिनिटे प्लॅटफॉर्मवर थांबली.

‘डेमू’च्या श्रेयवादावरून जोरदार धुसफूस
४फुलांनी सजविलेल्या ‘डेम’ूवर राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक पोस्टर्स लावण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून ही गाडी सुरू झाल्याचा दावा करीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही पोस्टर्स लावली होती. याचा भाजपतर्फे निषेध करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.
४श्रेयासाठी करण्यात आलेल्या या पोस्टरबाजीची चर्चा उद्घाटनप्रसंगी रंगली होती. याची जाणीव झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डेमूच्या इंजिनसमोर लावलेले पोस्टर काढले. भाजपाचे काही कार्यकर्ते गळ्यात पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे घालून आले होते. त्यावर सुळे यांनी आक्षेप घेतला. शिरोळे यांनी त्या कार्यकत्यांना ते उपरणे काढून मागच्या रांगेत बसायला सांगितले. तरीही संतापलेल्या सुळे व्यासपीठावरून उतरून थेट रेल्वेत जावून बसल्या. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर त्या पुन्हा व्यासपीठावर आल्या.

राष्ट्रवादी-भाजपाची धक्काबुक्की
केडगाव : पुणे येथील रेल्वे स्थानकावर भाजपाच्या पुणे ग्रामीण भागातील एका पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी धक्काबुकी केली. डेमू लोकल सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न यावरून भाजपा व राष्ट्रवादी यांच्यामध्ये श्रेयवाद चालला होता. त्याचे पर्यवसान आजच्या भांडणामध्ये झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ‘चालायला लागा’ असा आवाज त्यांनी टाकला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे व सदर पदाधिकाऱ्याची तणाताणी झाली. यानंतर राष्ट्रवादीचा एक जिल्हा पदाधिकारी हा ग्रामीण भागातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. याच वेळी भाजपा कार्यकर्ते पुढे आले. त्यानंतर प्रचंड गोंधळ झाला.

प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने पुणे ते दौंडदरम्यान डेमू सेवा सुरू केली असली तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही असे दिसते. पुणे व दौंड येथून डेमुच्या सुटण्याच्या वेळा प्रवाशांसाठी सोयीस्कर नाहीत. पहाटे पाच वाजता दौंड येथून तर सायंकाळी पुण्यातून गाडी सोडण्याची मागणी आहे. असे असताना दौंड येथून दुपारी दोन्ही गाड्या सोडल्या जाणार आहे. या वेळापत्रकात बदल करण्याची गरज आहे.
- विकास देशपांडे, सदस्य, क्षेत्रीय प्रवासी समिती

Web Title: Dalmatan's Daund to give a welcome welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.