जिल्ह्यातील साडेचार हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:11 AM2021-07-27T04:11:55+5:302021-07-27T04:11:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीत व ढगफुटीसदृश पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीत व ढगफुटीसदृश पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे व शेत पिके आणि जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आली असून, आठवडाभरात पंचनाम्याचा अंतिम अहवाल प्राप्त होतील असे, जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हे, मावळ मुळशी पश्चिम घाट माथ्यावर तुफान पाऊस झाला. अतितीव्र पावसामुळे मावळ भागातील भात पिके तसेच जमिनीचे बांध फुटणे जमीन खरडून जाणे अशा प्रकारचे नुकसान झाले आहे. प्राथमिक नजर अंदाजानुसार साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील पिके आणि काही प्रमाणात जमिनीचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षात पंचनाम्याची अंतिम कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा खरा आकडा समोर येईल. याबाबत देशमुख यांनी सांगितले, गावपातळीवर तलाठी, सर्कल, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्यामार्फत पंचनाम्याची कारवाई केली जाईल. अद्यापही काही भागात मोठा पाऊस असल्याने पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. थोडीशी उघडीप मिळताच पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल.