निवडणुकीत पराभव झाल्याने उकरला रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 01:37 AM2018-09-27T01:37:24+5:302018-09-27T01:37:42+5:30
पानसरेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पराभव सहन न झाल्याने एका व्यक्तीने पानसरेवाडीतून कासारमळ्याकडे जाणारा सार्वजनिक रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उकरला आहे.
सुपे - पानसरेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पराभव सहन न झाल्याने एका व्यक्तीने पानसरेवाडीतून कासारमळ्याकडे जाणारा सार्वजनिक रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उकरला आहे. येथील मार्गच बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
पानसरेवाडी येथील गावठाणापासून दोन किलोमीटरवर कासारमळा आहे. यापूर्वी येथे जाण्यासाठी रस्ता नव्हता. मात्र मागील पंधरा वर्षांपूर्वी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्याने रस्त्याचे काम मार्गी लावले. त्यामुळे कासारमळ्याकडे जाण्यासाठी खडी व मुरमीकरणाचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र मागील तीन महिन्यापूर्वी येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीत बाळासाहेब जयसिंग पानसरे यांचा पराभव झाला. येथील नागरिकांनी मला मतदान केले नाही. मला पराभव स्वीकारावा लागला. या कारणास्तव पानसरे यांनी स्वत:च्या शेतातून जाणारा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उकरला आहे. त्यामुळे कासारमळ्याकडे जाणारा रस्ताच बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय
झाली आहे.
कुठलाही रस्ता शासकीय खर्ची पडलेला असेल आणि कोण व्यक्ती तो रस्ता बंद करीत असेल, तर त्याच्यावर ग्रामसेवकाने फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.
- हनुमंत पाटील,
तहसीलदार, बारामती तालुका
येथील नागरिकांना येण्या-जाण्याची गैरसोय झाली आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन दिले आहे.