धरणांचा पाणीसाठा ३० ते ४० टक्क्यांनी कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 11:37 PM2019-01-06T23:37:07+5:302019-01-06T23:37:33+5:30
कळमोडी, चासकमान, नाझरे, भाटघर धरणाचा समावेश : उर्वरित धरणात १५ ते २० टक्के साठ्याचा तुटवडा
पुणे : नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी कमी आहे, तर पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पाणी देणाºया धरणात १५ ते २० टक्के पाण्याचा तुटवडा दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही महिने शेतीसाठी व शहरी भागातील नागरिकांसाठी चांगलेच अडचणीचे जाणार आहेत.
मागील वर्षी धरण परिसरात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे सर्वच धरणे शंभर टक्के भरली होती. धरणे भरल्याने खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे उजनी धरण शंभर टक्क्यांहून अधिक भरले होते. यंदा परतीच्या पावसाने दगा दिला. मात्र, जून-जुलैपासून सप्टेंबर महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत धरण परिसरात पावसाच्या मध्यम व जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील टेमघर वगळता सर्वच धरणे शंभर टक्के भरली. मात्र, परतीचा पाऊस होईल, असे गृहित धरून पुन्हा खडकवासल्यातून विसर्ग सोडला. परिणामी यावर्षीही उजनी धरण शंभर टक्के भरले. परंतु, यंदा पुण्यासमोर मोठा पाणीप्रश्न उभा राहिला आहे.
1जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाºया कळमोडी, चासकमान, भामा-आसखेड, आंद्रा, पवना, मुळशी, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा-देवघर, भाटघर, वीर या धरणात ६ जानेवारी २०१८ रोजी ९५.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा होता.तर याच धरणांमध्ये ६ जानेवारी २०१९ रोजी ७७.१८ एवढा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गेल्या 2वर्षाच्या तुलनेत यंदा या धरणांमध्ये १८ टीएमसीहून अधिक पाणीसाठा कमी आहे. तर पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाºया खडकवासला धरण प्रकल्पात १७.४३ टीएमसीएवढाच पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षापेक्षा हा साठा ४.१३ टीएमसीने कमी आहे. गेल्या वर्षी ६ जानेवारी २०१८ रोजी प्रकल्पात २१.५६ टीएमसी एवढा पाणीसाठा होता.
जिल्ह्यातील धरणातील ६ जानेवारीच्या पाणीसाठ्याची टक्केवारी (कंसात टीएमसीमध्ये)
धरणाचे नाव २०१८ २०१९
कळमोडी ९९.११ (१.४९) ५१.४४ (०.७८)
चासकमान ८०.४३ (६.०९) ४४.८७ (३.४०)
भामा-आसखेड ६.७४ (६.७४) ७०.३१ (५.३९)
आंद्रा ९६.५१ (२.८२) ८५.४९ (२.५०)
पवना ७७.०२ (६.५५) ६५.७२ (५.५९)
मुळशी ६७.८१ (१२.५२) ६५.४६ (१२.०८)
टेमघर ०.२३ (०.०१) ३.३५ (०.१२)
वरसगाव ८३.१७ (१०.६६) ६९.२५ (८.८८)
पानशेत ९०.२७ (९.६१) ६७.७६ (७.२२)
खडकवासला ६४.७५ (१.२८) ६१.५१ (१.२१)
गुंजवणी ५०.४६ (१.८६) ५१.७१ (१.९१)
नीरा देवघर ८३.३३ (९.७७) ५७.६६ (६.७६)
भाटघर ८८.२८ (२०.७५) ६१.५६ (१४.४७)
वीर ६०.६८ (५.७१) ७४.२६ (६.९९)
नाझरे ५३.६४ (०.३२) ०.०० (०.००)
उजनीत केवळ ४१ टक्के पाणी
जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे उजनी धरण दोन्ही वर्षी १०० टक्के भरले होते. मात्र, मागील वर्षी ६ जानेवारी २०१८ रोजी उजनीत १०४.३५ टक्के म्हणजेच ५५.९० टीएमसीएवढा पाणीसाठा होता. मात्र, यंदा ६ जानेवारी २०१९ रोजी उजनीत ४१.३३ टक्के पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा २२.१४ टीएमसी आहे.