दौंड नगर परिषदेची सभा वादळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:54 PM2018-08-31T23:54:38+5:302018-08-31T23:54:55+5:30
सभागृहात गोंधळ : पाच तासांच्या सभेत समाजाच्या हिताचा एकही निर्णय नाही
दौैंड : दौैंड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी झाली. सुमारे पाच तास चाललेल्या या सभेत सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून मात्र कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. नगराध्यक्षा शीतल कटारिया, उपनगराध्यक्ष राजेश जाधव, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात या वेळी उपस्थित होते.
या सभेत दोन्ही गटांतील नगरसेवकांची रेल्वे कुरकुंभ मोरीच्या प्रश्नावरून हमरीतुमरी झाली. त्यातच नागरिक हित संरक्षण मंडळाचे गटनेते राजेश गायकवाड म्हणाले, की बारामतीला रेल्वे उड्डाणपूल होतो; मात्र दौैंड शहरात रेल्वे कुरकुंभ मोरी होत नाही. असे म्हणताच राष्ट्रवादीचे गटनेते बादशहा शेख म्हणाले, की तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुरकुंभ मोरीसाठी निधी दिला; मात्र मोरीचे काम कोणी अडविले, याचा विचार झाला पाहिजे. ते असे म्हणताच नगरसेवक शहानवाज पठाण म्हणाले, की कुरकुंभ मोरीला आमचा विरोध नाही. मोरी झालीच पाहिजे. एकंदरीतच, कुरकुंभ मोरीसंदर्भात ठराव मताला घ्या, आमचे मत त्यात घ्या. या गोंधळात एक तास निघून गेला.
सुरुवातीला मुख्याधिकारी थोरात म्हणाले, की थकबाकीदारांकडे गेल्यानंतर नगरसेवकांचा दबाव येतो. त्यांना शिवीगाळ केली जाते ही गंभीर बाब आहे. वास्तविक पाहता, नगरसेवक आणि कामगार यांनी खेळीमेळीने एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी कामकाज केले पाहिजे. यावर ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया म्हणाले, की जे कोणी नगरसेवक हस्तक्षेप करीत असतील, त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा. तर, इंद्रजित जगदाळे म्हणाले, की हस्तक्षेप करणाºया नगरसेवकांचे रेकॉर्डिंग करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. शेवटी गावाचा विकास होणे महत्त्वाचे आहे. विकासात राजकारण आणू नका, असे जगदाळे म्हणाले.
आरोग्य समितीच्या सभापती संध्या डावखरे म्हणाल्या, की शहरात आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही ठोस पावले उचलली जात नाहीत. डेंगीची साथ सुरू आहे. फक्त नगरसेवकांच्या घराजवळ फवारणी केली जाते; मात्र गोरगरिबांच्या घरांजवळ फवारणी केली जात नाही. तेव्हा नगर परिषदेचा आरोग्य अधिकारी बदलून टाका, नाही तर माझा राजीनामा घ्या, या भूमिकेवर डावखरे ठाम होत्या.
नगरसेवक जीवराज पवार म्हणाले, की डेंगीची साथ आटोक्यात आणणे काळाची गरज आहे. आरोग्याच्या बाबतीत नियोजन केले जात नाही. तर, नगरसेविका अनिता दळवी म्हणाल्या, की पावसाळ्यापूर्वी आरोग्याच्या दृष्टिकोनातून नियोजन केले पाहिजे होते; मात्र तसे झाले नाही. परिणामी, डेंगीची साथ फोफावली. नगरसेविका प्रणोती चलवादी म्हणाल्या, की गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, दोन आरोग्य अधिकारी नेमावेत; जेणेकरून आरोग्याचा प्रश्न संपुष्टात येईल. या वेळी गौैतम साळवे, मोहन नारंग, बबलू कांबळे, विलास शितोळे, प्रमोद देशमुख, संजय चितारे, वसीम शेख या नगरसेवकांनी चर्चेत भाग घेतला.
...आणि उपनगराध्यक्ष संतापले
४दौैंडचे उपनगराध्यक्ष राजेश जाधव हे शांत स्वभावाचे आहेत. कुठल्याही नगर परिषदेच्या बैठकीत किंवा जनसामान्यांत ते जास्त बोलत नाहीत. परंतु, नगर परिषदेच्या झालेल्या सभेत दोन्ही गटांचे गोंधळी वातावरण पाहता ते संतापून म्हणाले, की ‘काय गोंधळ चाललाय? जी काही चर्चा करायची
ती शांततेत करा.’ एकंदरीत, त्यांचा संताप पाहून उपस्थित नगरसेवक अवाक झाले.