दौंडला तोतया पोलिसांना अटक, खंडणीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:04 AM2019-02-18T00:04:03+5:302019-02-18T00:04:18+5:30
दौंड येथील घटना : खंडणीचा गुन्हा दाखल
दौंड : वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून दौंड तालुक्यात हॉटेल व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या ४ तोतया पोलिसांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघे फरार असल्याची माहिती पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांनी दिली.
पंकज मिसाळ (वय २८, रा. निमगाव केतकी, इंदापूर), राहुल चव्हाण (वय २०, रा. मदनवाडी, ता. इंदापूर), अंकिता भोसले (वय २९), प्रज्ञा भोसले (वय २१ , दोघीही रा. बारामती) यांना अटक करण्यात आली आहे, तर ओंकार शितोळे (रा. पाटस , ता. दौंड), दादा (पूर्ण नाव समजू शकले नाही, रा. इंदापूर) हे दोघे फरार झाले आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास गिरीम फाटा येथील साई पॅलेस हॉटेलजवळ एका गाडीतून ४ तरुण आणि २ तरुणी उतरल्या. दरम्यान, या वेळी त्यांनी हॉटेलच्या काउंटरला घेरा घातला. यावेळी त्यांनी हॉटेल व्यावसायिकाला तुमच्या हॉटेलमध्ये अवैध व्यवसाय सुरू असतो. आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी आहोत, असे सांगून यातील एकाने काउंटरच्या गल्ल्यात हात घालून ३० हजार काढून घेतले. तुला प्रकरण मिटवायचे असेल तर १ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितल. अंकिता भोसले हिच्याकडे भारत अगेन्स्ट करप्शन या संस्थेचे ओळखपत्र होते. ओळखपत्र हॉटेलचालकाला दाखविले. यानंतर त्याने २५ हजार रुपये दिले. यानंतर ते पैसे घेऊन ते पसार झाले. हॉटेलमध्ये झालेल्या गोंधळावरून हॉटेलचालक चंद्रशेखर रेड्डी (रा. गजानन सोसायटी, दौंड) यांना शंका आल्याने त्यांनी तोतया पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केला.
हे तोतया पोलीस खडकी येथील बब्बी ढाबाचालक रवी पुजारी याला धमकावत होते, हा प्रकार तोतया रेड्डी यांनी पाहिला. रवी पुजारी यांनी तोतया पोलिसांना वीस हजार रुपये दिले. काही वेळेतच पुजारी यांनी रावणगाव पोलिसांबरोबर संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलीस तातडीने घटनास्थळी आले. याप्रसंगी तोतया पोलिसांची धांदल उडाली. यातील चौघांना पोलिसांनी जेरबंद केले तर दोघे भिंतीवरून उड्या मारून पळाले. याप्रकरणातील आरोपी पंकज मिसाळ हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहेत.
चोरी करणाºयांना हटकल्याने मारहाण
सांगवी : येथील एका शेतातून पीकाची चोरी करत असतांना शेतमालकाने चोरट्यांना हटकल्याने त्यांना चोरट्यांनी पिस्तूल दाखवत, जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश खंडू लोखंडे (वय ४०, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. तर आरोपी बेंबट्या आजिनाथ भोसले, दत्ता आजिनाथ भोसले, अकबर आजिनाथ भोसले, विजा आजिनाथ भोसले, सागर आजिनाथ भोसले, गोविंद ऊर्फ गोट्या दुर्योधन काळे, हिंदूराव सयाजी पवार, चैत्री अजिनाथ भोसले, अश्विनी बेंबट्या भोसले, सुनीता दत्ता भोसले, मर्दानी अकबर भोसले, अक्षय पवार, चांदणी अक्षय पवार, करण जकल पवार, नीलम करण पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवार (दि.११) लोखंडे यांना डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे शेतातील भोपळ्याचे पीक चैत्री आजिनाथ भोसले हिच्या सुना पोत्यात भरून नेत असल्याचे दिसले. यावेळी लोखंडे यांनी त्यांना हटकले. त्यावर उलट चोरी करणाºया महिलांनी लोखंडे यांच्यावर धावून जात तुझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात छेडछाड व जातीवाचक बोलण्याची तक्रार देईन, तुझ्याकडे बघून घेऊ असे म्हणत, सर्व लोखंडे यांच्या घरात घुसले. लोखंडे यांच्या पत्नी व त्यांना शिवीगाळ दमदाटी केली. यानंतर बेंबट्या भोसले याने कमरेचा पिस्तूल काढत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी इतर महिलांनी त्यांच्या पत्नीस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिच्याजवळ असलेले १ हजार ८२० रुपये हिसकावून घेतले. तर करण पवार याने फिर्यादीच्या मानेवर कोयता ठेवून बारामती येथे भाडोत्री गाळा घेण्यासाठी मित्रांकडून घेतलेले ६ हजार रुपये जबरदस्तीने घेऊन निघून गेले. पुढील तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे हे अधिक तपास करीत आहेत.