माध्यमांची विभागणी करून दमदाटी - राजदीप सरदेसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:43 AM2017-11-28T04:43:48+5:302017-11-28T04:43:59+5:30
माध्यमांची राष्ट्रवादी आणि राष्ट्रविरोधी अशी सरसकट विभागणी करून त्यांना दमदाटी केली जात आहे. दुर्दैवाने माध्यमांमध्येही संपादन आणि संतुलन नाहीसे झाले आहे.
पुणे : माध्यमांची राष्ट्रवादी आणि राष्ट्रविरोधी अशी सरसकट विभागणी करून त्यांना दमदाटी केली जात आहे. दुर्दैवाने माध्यमांमध्येही संपादन आणि संतुलन नाहीसे झाले आहे. बातमी आणि मत, खरे अणि खोटे यातील सीमारेषा पुसट होत आहेत. लेखणीतील ताकदच क्षीण होत चालली आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केली.
पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सिंंबायोसिस सोसायटी यांच्या विद्यमाने दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानमालेच्या पहिल्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी सिंंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजूमदार होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर व सिंंबायोसिस विद्यापीठाच्या कुलगुरू रजनी गुप्ते उपस्थित होत्या.
सरदेसाई म्हणाले, ‘सर्वप्रथम बातमी देण्याच्या स्पर्धेत त्यामागील विश्लेषण, वास्तव समजूनच घेतले जात नाही. पेज ३ वरील बातम्यांनी पान एकवरील जागा पटकावली आहे. करणी सेनेच्या बातम्या पहिल्या पानावर झळकतात. बातम्यांमध्ये सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. पत्रकारांनी तारतम्य न बाळगल्याने माध्यमांची विश्वासार्हता कमी होत आहे. पाडगावकर यांच्या काळातील पत्रकारितेचा आता लवलेशही पाहायला मिळत नाही.’ डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी दिलीप पाडगावकरांच्या यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. गेल्या वर्षी १३ नोव्हेंबरला पाडगावकरांच्या हस्ते डॉ. माशेलकर यांचा सत्कार झाला होता, तो त्यांचा अखेरचा कार्यक्रम ठरला, असे माशेलकर यांनी नमूद केले. पाडगावकरांच्या पत्नी लतिका उपस्थित होत्या.
जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी नेमलेल्या पाडगावकर समितीचा अहवाल अजून धूळ खात पडला आहे, असे सांगून सरदेसाई म्हणाले, ‘त्यांनी काश्मीरमधल्या सर्व घटकांची भेट घेऊन चर्चा करून हा अहवाल बनवला होता. त्यामधून प्रश्न सोडवणारा मध्यममार्ग सरकारला गवसला असता; पण राजकीय पक्षांच्या मतभेदांमुळे काश्मीरचा प्रश्न भलतीकडे जातो आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणायची असेल तर पाडगावकर समितीचा अहवाल केंद्र सरकारला बाहेर काढून अमलात आणावा लागेल.’ सोशल मीडियावर हल्ला चढवताना सरदेसाई म्हणाले, ‘सोशल मीडिया हे मते व्यक्त करण्याचे मुक्त व्यासपीठ बनले आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता सोशल मीडियावर चुकीची माहिती, फोटो प्रसारित केले जातात. त्यामुळे या माध्यमामध्ये अराजक माजलेले आहे. त्यावर सक्षम नियंत्रण आणणे आवश्यक आहे.’