महाराष्ट्रीय मंडळाचे दामले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:09 AM2021-04-03T04:09:06+5:302021-04-03T04:09:06+5:30
पुणे : महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय रमेश दामले यांचे शुक्रवारी (दि. २) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५५ वर्षांचे ...
पुणे : महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय रमेश दामले यांचे शुक्रवारी (दि. २) अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी नेहा, मुलगा रणजी क्रिकेटपटू रोहन आणि सून डाॅ. तन्मयी आणि एक बहीण असा परिवार आहे. देशी खेळांना प्रोत्साहन देणारा कुशल क्रीडा संघटक ही त्यांची ओळख होती.
धनंजय दामले गेली ९ वर्षे महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस म्हणून काम करत होते. सध्या ते पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष, जिल्हा जलतरण संघटना आणि पुणे जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात दामले यांनी भरीव योगदान दिले होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आजोबा कै. शिवरामपंत दामले आणि वडील रमेश दामले यांच्या क्रीडा प्रेमाचा आणि संस्थाचालकाचा वारसा ते समर्थपणे चालवत होते. ‘चला मैदानावर’ आणि ‘रहा निरोगी’ या दोन पुस्तकांसह क्रीडा विषयावर त्यांनी विपूल लेखन केले आहे. पुण्यातील क्रीडाक्षेत्रातील उत्कृष्ट क्रीडा संघटक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकार पदाधिकाऱ्याच्या अकाली निधनाने या दोन्ही क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.