खेडच्या पूर्व भागातील बंधारे पडले कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:26+5:302021-03-08T04:11:26+5:30
खेड तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. यंदा मात्र मार्च महिन्यातच बंधारे कोरडेठाक पडले आहेत. ...
खेड तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. यंदा मात्र मार्च महिन्यातच बंधारे कोरडेठाक पडले आहेत. विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. शेतकऱ्यांनी शेतात घेतलेली पिके जळून गेली आहेत. चारा पाण्याच्या शोधात आलेल्या मेंढपाळांना शेळ्या, मेंढ्या घेऊन पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. काही मेंढपाळांनी पिण्यासाठी पाणीच नसल्याने हा परिसर सोडणे पसंद केले आहे. कनेरसर (ता. खेड) येथील वेळ नदीवरील बंधारा गेल्या काही दिवसांपूर्वीच कोरडा पडला आहे. त्याचप्रमाणे वरुडे येथील बंधाराही कडक उन्हामुळे कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. गुळाणी येथील तलावात २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. येथील शेतकरी रात्रंदिवस शेतीसाठी पाणीउपसा करीत असल्यामुळे तसेच उन्हामुळे हा तलाव लवकरच रिकामा होणार आहे. अजून उन्हाळ्याचे अडीच महिने शिल्लक आहेत. पाणीसाठा संपल्यानंतर जनावरांच्या पिण्याचे हाल होणार असून पाण्यासाठी रानोमाळ भटकावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
फोटो ओळ: कनेरसर (ता. खेड) येथील वेळ नदीवरील कोरडाठाक बंधारा
फोटो ओळ: गुळाणी (ता. खेड) येथील तलावात २० टक्के पाणीसाठा उरला आहे.