पुण्यातील धरणे १०० टक्के भरली; मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु, नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 01:03 PM2024-08-05T13:03:09+5:302024-08-05T13:03:40+5:30

जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्यात तब्बल चार महिन्यांतील पाऊस पडला आहे

Dams in Pune 100 percent full Flooding begins on a large scale alert warning to riverside houses | पुण्यातील धरणे १०० टक्के भरली; मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु, नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा

पुण्यातील धरणे १०० टक्के भरली; मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु, नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा

पुणे : गेल्या तीन- चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली असून, खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. परिणामी, सिंहगड रोड परिसरातील अनेक भागांमध्ये रविवारी (दि.४) पाणी शिरले. बऱ्याच इमारतींच्या पार्किंग पुराच्या पाण्याने भरल्याने नागरिक अडकून पडले आहेत. नागरिकांना मदतकार्यासाठी लष्कराचे जवान, अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात केले आहेत. जवानांनी बोटीच्या माध्यमातून पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली. पावसाचा जोर वाढल्याने पुण्यातील आणखी काही भागांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज दिला होता. तो खरा ठरत असून, जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्यात तब्बल चार महिन्यांतील पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिना सुरू झाला असून, पावसाचा जोर मात्र वाढतच आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली आहेत. उजनी धरणदेखील शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. पुणे शहरात आणि घाटमाथ्यावर पावसाची हजेरी कायम आहे. आणखी एक- दोन दिवस असाच पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी- रविवारी तर पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार रविवारी सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्गही वाढविण्यात आला. रविवारी सायंकाळी ५ वाजता तर ४५ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. तत्पूर्वी, दुपारी सिंहगड परिसरातील अनेक भागांत पाणी शिरले. अनेक नागरिक इमारतींमध्ये अडकून पडले. त्यांना अग्निशमन दलाचे आणि लष्कराचे जवान सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत होते. हवामान विभागाने शहरात आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ६ ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सद्यस्थितीत खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ३५ हजार ९४८ क्युसेक विसर्ग कमी करून दुपारी १२ वाजता २१  हजार १७५ क्यूसेक करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो असे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. 

पुणे शहर आणि घाटमाथ्यावर गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे पूर्ववाहिनी नद्याही भरून वाहत असून, धरणे भरली आहेत. घाटमाथ्यावरील पावसाचे पाणी थेट खाली येते. पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली आहेत. अजून दोन दिवस पुण्यात पावसाचा अंदाज आहे. ६ ऑगस्टनंतर हळूहळू पाऊस कमी होईल. -माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ, पुणे

घाटमाथ्यावरील रविवारचा पाऊस

लोणावळा : १८१ मिमी
वाळवण : १५७ मिमी
भिवपुरी : ४४ मिमी
मुळशी : ५२ मिमी

पुण्यातील रविवारचा पाऊस

माळीण : ४२.५ मिमी
वडगावशेरी : ३९.५ मिमी
शिवाजीनगर : ३७ मिमी
चिंचवड : ३६. ५ मिमी
पाषाण : ३४.१ मिमी
तळेगाव : २८.५ मिमी
राजगुरूनगर : १६.५ मिमी
आंबेगाव : १४ मिमी
हडपसर : १३ मिमी
एनडीए : ७.५ मिमी
हवेली : ११.५ मिमी

अवघ्या १० दिवसांत उजनी भरले!

उजनी धरणसाठा २५ जुलैपर्यंत उणे पातळीत होता; पण अवघ्या १० दिवसांतच हे धरण १०० टक्के भरले. कदाचित सोमवारी ते शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. अवघ्या ९ दिवसांत उजनी धरणात ४५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी उणे झालेले उजनी धरण आता भरणार आहे, तसेच पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणे आता ९० टक्क्यांच्या पुढे गेली आहेत.

उजनीमुळे चार जिल्ह्यांना दिलासा!

सध्या उजनीत १०७ टीएमसी पाणीसाठा झाला असून, एकूण क्षमता ११७ टीएमसी आहे. धरणात दौंडवरून पाण्याची आवक येत आहे. उजनी धरणावर पुणे, नगर, धाराशिव व सोलापूर, अशा चार जिल्ह्यांच्या ४२ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

धरणांतील पाणीसाठा

खडकवासला : ७२.१७ टक्के
टेमघर : १०० टक्के
पाणशेत : ९२.३३ टक्के
वरसगाव : ९१.०३ टक्के

Web Title: Dams in Pune 100 percent full Flooding begins on a large scale alert warning to riverside houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.