खोर परिसरातील बंधारे भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:14 AM2021-09-08T04:14:05+5:302021-09-08T04:14:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खोर : खोर (ता. दौंड) येथील फरतडेवस्ती तलावात पाणी सोडण्यात आले आहे. जनाई-शिरसाई वितरिका टप्पा क्र. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खोर : खोर (ता. दौंड) येथील फरतडेवस्ती तलावात पाणी सोडण्यात आले आहे. जनाई-शिरसाई वितरिका टप्पा क्र. ३ मधून पाणी सोडून हे पाणी खोरच्या फरतडेवस्ती येथील तलावात सोडण्यात आले. या जनाई-शिरसाई योजनेतून तब्बल २५० तास पाणी सोडण्यात आल्याने खोरच्या ओढ्याला पाणी आले आहे. हे पाणी आणण्यासाठी खोर ग्रामस्थांनी मोठा पाठपुरावा केला होता. यासाठी लोकवर्गणीही काढण्यात आली होती. शासकीय नियमानुसार १९ टक्के रक्कम वीजबिल भरणा ही शेतकरीवर्गाने केला आहे. यामध्ये ८१ टक्के रक्कम ही शासन भरणा करून हे पाणी सोडण्यात आले आहे.
या पाण्याने खोर परिसरातील ओढे तुडुंब भरून खळखळून वाहू लागल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. खोर परिसरातील असलेल्या डोंबेवाडी, लवांडेवस्ती, गायकवाडवस्ती, खोर गावठाण, कुदळेवस्ती, पाटलाची वाडी, पिंपळाचीवाडी येथील बंधारे तुडुंब भरले गेल्याने तूर्तास खोर परिसरातील शेतकरीवर्गाचा पाणी प्रश्न मार्गी लागला गेला आहे. या सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे विहिरींना देखील चांगला फायदा झाला असून, पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जनाई शिरसाई योजनेच्या माध्यमातून वर्षातून किमान ३ ते ४ वेळा जर हे आवर्तन सुटले गेले तर या भागातील शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळेल व फळबागांना पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार नाही अशी या भागातील शेतकरीवर्गाची माफक अपेक्षा आहे.
फोटोओळ : खोर (ता. दौंड) येथील फरतडेवस्ती तलावात सोडण्यात आलेले पाणी. (छायाचित्र : रामदास डोंबे, खोर)