नृत्याची साधनाच चिरंतन अन् मौलिक
By Admin | Published: April 29, 2017 04:28 AM2017-04-29T04:28:25+5:302017-04-29T04:28:25+5:30
टीव्हीवर कोणताही चॅनेल लावल्यावर रिअॅलिटी शोचा भडिमार... ‘मुझे व्होट करने के लिए इस नंबर पर मेसेज करे’चे अपील... मेंटरकडून ‘स्टँडिंग ओव्हेशन’
प्रज्ञा केळकर-सिंग / पुणे
टीव्हीवर कोणताही चॅनेल लावल्यावर रिअॅलिटी शोचा भडिमार... ‘मुझे व्होट करने के लिए इस नंबर पर मेसेज करे’चे अपील... मेंटरकडून ‘स्टँडिंग ओव्हेशन’ अथवा निवेदकाकडून ‘गिव्ह हिम अ बिग रन अप्लॉज’चे संवाद सातत्याने कानावर पडतात. नृत्यावर आधारित रिअॅलिटी शोची लाट पाहताना नव्या पिढीचा नृत्याकडील कल वाढत आहे, की ही पिढी पारंपरिक नृत्यापासून दूर चालली आहे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कंटेंपररी, बॉलिवूड, हिपहॉप अशा नृत्यांचे पेव फुटले असले तरी शास्त्रीय नृत्याचे मूलभूत शिक्षण घेतल्याशिवाय ते खऱ्या अर्थाने जाणून घेता येत नाही, अशा भावना नृत्यांगना आणि नृत्यशिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
२९ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय थिएटर संस्थेतर्फे जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर (१७२७-१८१०) यांचा हा जन्मदिन. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. जागतिकीकरणाच्या स्पर्शापासून नृत्य दूर राहिले नाही. त्यामुळे नृत्यावर पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव पडला. नृत्याचे नानाविध कंगोरे, प्रकार, स्टाईल भारतात लोकप्रिय होऊ लागल्या. सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील गाण्यांचा भडिमार, पाश्चात्त्य नृत्यशैली मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्या. रिअॅलिटी कार्यक्रमांमुळे सध्याच्या पिढीमध्ये कंटेंपरररी, बॉलीवूड, हिपहॉप, सालसा, झुंबा अशा विविध प्रकारांचे गारुड पहायला मिळते. सध्या पुण्यात सालसा, हिपहॉप, भरतनाट्यम, बॉलीवूड असे विविध प्रकार लोकप्रिय झाले आहेत. नृत्यकला लोकाभिमुख झाली आहे, याचा अभिमान बाळगायला हवा. सर्व स्तरांतील लोकांमध्ये नृत्य कलेबाबत अभिरुची निर्माण होत आहे. मात्र, शास्त्रीय नृत्याबाबत अधिकाधिक जागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे.