नृत्य, संगीताने रंगला शनिवारवाडा महोत्सव; गोतिपुआ नृत्याने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:53 AM2018-02-26T11:53:26+5:302018-02-26T11:53:26+5:30
नृत्य, संगीत, ताल, लय यांचा अजोड मिलाफ असलेला १७ वा शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव ऐतिहासिक शनिवारवाड्यावर रंगला. पवित्र भट व सहकारी यांच्या ‘श्रीरंगा द रिक्लाइनिंग लॉर्ड’ या नृत्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरूवात झाली.
पुणे : नृत्य, संगीत, ताल, लय यांचा अजोड मिलाफ असलेला १७ वा शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव ऐतिहासिक शनिवारवाड्यावर रंगला. पवित्र भट व सहकारी यांनी सादर केलेला ‘श्रीरंगा द रिक्लाइनिंग लॉर्ड’ हा कार्यक्रम आणि नक्षत्र गुरुकुलाने सादर केलेले गोतिपुआ नृत्य हे या महोत्सवाचे यंदाचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाचा प्रारंभ शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव समिती अध्यक्षा सबीना संघवी, आयोजन समितीच्या सदस्या गायत्रीदेवी पटवर्धन, वर्षा चोरडिया, नीलम सेवलेकर आणि रेखा क्रिशन तसेच गणेश नटराजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी एक मिनिट मौन पाळून प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पवित्र भट व सहकारी यांच्या ‘श्रीरंगा द रिक्लाइनिंग लॉर्ड’ या नृत्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. ‘श्रीरंगा’ या कार्यक्रमात एका भक्ताचा पवित्र कावेरी नदीपासून सध्याच्या तामिळनाडू राज्यातील श्रीरंगम् येथील रंगनाथस्वामीपर्यंतचा प्रवास सादर केला गेला. भक्ताने मंदिरात प्रवेश करताक्षणी गरूड त्याचे स्वागत करतो. या संपूर्ण नृत्याविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आबा अथणीकर, वृद्धी शहरकर, निधी पटेल, पूर्वा बापट, अंजना मेनन, अश्वथी पणिकर, सोनिया मालगुंडकर, श्वेता मेनन आणि श्वेता पणिक्कर यांनी हे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे संगीत वासुदेव अय्यंगार यांनी दिले. ध्वनीयोजना श्रीकांत व प्रकाशयोजना पल्लवी गुर्जर यांची होती.
सूत्रसंचालन सोनिया चांद यांनी केले.
गुंतागुंतीच्या मुद्रांना उपस्थितांची दाद
- मध्यंतरात कलावंतांचा सत्कार झाल्यावर नक्षत्र गुरुकुलाने सादर केलेले गोतिपुआ नृत्य सादर झाले. नक्षत्र गुरुकुलाची स्थापना त्याचे संस्थापक संचालक गुरु बिजय कुमार साहू यांनी २००७ मध्ये भुवनेश्वर येथे केली.
- ओडिसी डान्सचा पूर्वावतार असलेले गोतिपुआ नृत्य हे स्त्रियांची वेशभूषा व पोशाख केलेल्या मुलांनी सादर केले. गोतिपुआचा ओडिया भाषेतील अर्थ गोती म्हणजे मुलगी आणि पुवा म्हणजे मुलगा आहे. यात नर्तकाने अनेक गुंतागुंतीच्या मुद्रा करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
- उमेशचंद्र बरिक, सब्यसाची साहू, जगमोहन साहू, कुणाल प्रधान, अनंत जेना, अभिषेक साहू आणि पबित्रा साहू यांनी गोतिपुआ नृत्य सादर केले. याचे ध्वनीयोजना सचिन नाईकं व गायन अनंत मेहेरा यांनी केले, तर प्रकाशयोजना जयंत थत्ते यांची होती.