सिंहगड पायथ्याच्या हॉटेलमध्ये डान्स पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:32+5:302021-07-26T04:09:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत गर्दी जमवून सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील हॉटेल सानवी रिसोर्टमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत गर्दी जमवून सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील हॉटेल सानवी रिसोर्टमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. महिलांसोबत डान्स करणाऱ्या एका डॉक्टरासह ११ जणांवर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे.
हॉटेलमाल विनय सुभाष कांबळे (वय ३२, रा. आकाशनगर, वारजे), संदीप शंकर कोतवाल (वय ४७, रा. हिंगणमळा, हडपसर), सचिन विठ्ठल शिंदे (वय ३८, रा. आनंदनगर, सिंहगड रोड), कालीदास शशिराव काकडे (वय ५०, रा. हडपसर), विठ्ठल विजय माेरे (वय ४३, रा. हडपसर), राजेश बलभिम वाघमारे (वय ४५, रा. हडपसर) व इतर ४ महिला अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. डॉ. निखिल भाकरे हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
सिंहगड पायथ्याजवळील गोळेवाडी येथील हॉटेल सानवी रिसाेर्टमध्ये हॉटेल मालक विनय कांबळे आणि त्यांचा मित्र डॉ. निखिल भाकरे (रा. भाकरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आंबेगाव) यांनी आपल्या हॉटेलमधील दोन रुममध्ये डान्स पार्टी आयोजित केली असल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी सायंकाळी मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, हवालदार पासलकर, क्षीरसागर, पोलीस अंमलदार मंगेश भगत, अमोल शेडगे, नंदा कदम यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. तेव्हा तेथे एलईडी लाईट लावून साऊंड सिस्टिमवर गाणी लावून अनेक जण नाच करताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना पकडून हवेली पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याविरुद्ध कोविड नियमाचे भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.