नृत्य, संगीताला ‘हेरिटेज’मानून संवर्धन व्हावे
By admin | Published: January 11, 2016 01:09 AM2016-01-11T01:09:53+5:302016-01-11T01:09:53+5:30
नृत्य आणि संगीत या दोनच कला निखळ भारतीयत्वाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कला आहेत. नृत्य आणि संगीत आपले अस्सल भारतीयत्व जोपासताना नव्या वाटा शोधताना दिसतात
पुणे : नृत्य आणि संगीत या दोनच कला निखळ भारतीयत्वाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कला आहेत. नृत्य आणि संगीत आपले अस्सल भारतीयत्व जोपासताना नव्या वाटा शोधताना दिसतात. या प्रयोगक्षम कला म्हणजे जिवंत कला असून त्यांचे अस्तित्व कालमर्यादित आहे. या कलांना ‘हेरिटेज’ मानून त्यांचे संवर्धन व्हायला हवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नृत्यांगना आणि पहिल्या अखिल भारतीय नृत्य संमेलनाच्या अध्यक्षा शमा भाटे यांनी व्यक्त केली. या कलांचे जतन झाले नाही तर जाणाऱ्या पिढीबरोबर हा वारसा लुप्त होऊन जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
कलापिनी नृत्यालय सासवड, स्वामी विवेकानंद स्मारक समिती पुणे, अभिव्यक्ती पुणे आणि हिरकणी महिला प्रतिष्ठान सासवडतर्फे रविवारी पहिले अखिल भारतीय नृत्य संमेलन अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन समारोहात भाटे अध्यक्षपदावरुन बोलत होत्या. मुंबई विद्यापीठातील लोककला विभागाचे प्रा. डॉ. प्रकाश खाडगे, स्वागताध्यक्ष राजेंद्र शिळीमकर, धनश्री लोमटे, सुखदा खैरे, अमृता गोगटे आदी व्यासपीठावर होते. नृत्य क्षेत्रातील गुरुंच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन आणि नटराजपूजन करुन संमेलनाचे उद्घाटन झाले.
भाटे म्हणाल्या, नृत्य हे संमिश्र कलामाध्यम आहे. नृत्याच्या हातात हात घालून संगीत आणि साहित्य प्रविष्ट होते, चित्र आणि शिल्पांची संवेदनशील जाणीव उत्पन्न झाल्याखेरीज, नृत्याला घनता प्राप्त होत नाही. त्यामुळे नृत्यकला आपल्या संपूर्ण वैभवासह, दिमाखाने, प्रस्तुत व्हायची असेल तर या सगळ्या पैलूंचा सांगोपांग विचार, अध्ययी आणि प्रस्तुती या दोन्हींच्या अंतर्गत होणे आवश्यक आहे. येणाऱ्या नव्या पिढीला हा वारसा पुढे नेण्यासाठी, कल्पनेची भरारी घेण्यासाठी, परंपरेचा स्त्रोत जपण्यासाठी परंपरेचा तोच धागा पकडून जागतिक पातळीवर भारतीय नृत्यकलेचा यथायोग्य दर्जा, स्थान, महत्त्व सिद्ध करण्यासाठी काय करायला हवे, हा प्रश्न आहे.
महाराष्ट्राला स्वत:ची शास्त्रीय नृत्याची परंपरा नाही, परंतु ज्या दर्जाने, वैविध्याने, समृद्धीने महाराष्ट्रात नृत्य प्रस्तुत केले जाते त्याची नोंद समाजातल्या सर्व घटकांकडून घेतली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सुरुवातीस शमा भाटे यांनी नृत्याद्वारे शिवस्तुती सादर केली. संमेलनाचे थीमसॉँगवर कलासिद्धी नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशातील विविध नृत्यरचना सादर केल्या.
अमृता गोगटे व स्वानंद लोमटे यांनी संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली़ (प्रतिनिधी)