कोयता, पिस्तूल नाचविणे पडले महागात; आठ आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 05:37 PM2021-02-24T17:37:46+5:302021-02-24T17:39:16+5:30
हातात कोयता व पिस्तूल घेऊन नाचत दहशत निर्माण केल्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल
धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरात शिवजयंती दिवशी तडीपार गुंड रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारांनी हातात कोयता व पिस्तूल घेऊन नाचत दहशत निर्माण केल्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
रोशन दयानंद लोखंडे, प्रसाद धावडे,अनिकेत बावस्कर,शशिकांत यादव, स्वप्नील जागडे,किरण शिंदे,प्रज्वल धावडे,ओंकार सुतार या आठ आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींना शोध घेण्यात येत आहे.
नऱ्हे येथील पिराजी नगर चौकाजवळ डान्स करीत असलेल्या ग्रुपमधे नाचत असलेल्या तरुणांपैकी एकाकडे पिस्तुलही दिसत आहे. तसेच यातील काहींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने हे प्रकरण उजेडात आले होते. याप्रकरणी नागरिकांत दहशत माजविल्याप्रकरणी तसेच नऱ्हे येथील भूमकर पुलाखाली एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. अशा दोन घटनांतील मुख्य आरोपी रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारांविरूद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दोन विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रोशन लोखंडे याच्याविरुद्ध शस्त्र जवळ बाळगणे, दरोडा, आदी प्रकारचे गंभीर गुन्हे याआधी दाखल आहेत. त्याची तडीपारची ही दुसरी वेळ आहे.
या आरोपींचा गुन्हेगारी पार्श्वभूमी चा अभ्यास करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे सिंहगड रस्ता पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे,पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.