सोशल मीडियावर पेपरसेट करणाऱ्यांचा डंका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 12:17 AM2019-02-17T00:17:34+5:302019-02-17T00:17:51+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बीए, बीकॉम, बीएस्सीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

Dancers of papersets on social media | सोशल मीडियावर पेपरसेट करणाऱ्यांचा डंका

सोशल मीडियावर पेपरसेट करणाऱ्यांचा डंका

Next

दीपक जाधव

पुणे : विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठ परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या प्राध्यापकांची ओळख पूर्णत: गोपनीय ठेवणे बंधनकारक आहे. मात्र या तरतुदीचा भंग करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी आम्ही पेपर सेट करायला गेलो होतो, अशी शेखी मिरविणारा ग्रुप फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपवर टाकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बीए, बीकॉम, बीएस्सीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्या त्या विषयांच्या अभ्यास मंडळांकडून प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांची निवड केली जाते. या प्राध्यापकांनी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम अत्यंत गोपनीय पद्धतीने करणे आवश्यक असते. प्रश्नपत्रिका तयार करणे हे काम अत्यंत संवेदनशील मानले जाते. विद्यार्थ्यांना तसेच इतर कुणाकडेही याबाबत त्यांनी वाच्यता करायची नसते. मात्र ही गोपनीयता धुडकावून लावत प्रश्नपत्रिका तयार करणाºया अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी सोशल मीडियावर पेपर सेट करायला गेलो असल्याचे फोटो टाकल्याने विद्यापीठ वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आमची प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी निवड झाली, हे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील इतर प्राध्यापकांना सांगण्याच्या किंवा हिणवण्याच्या भावनेतून अति उत्साहाच्या भरात अशा प्रकारे ग्रुप फोटो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शिक्षक म्हणून नोकरी करताना काही गोष्टींचे भान राखणे अत्यंत आवश्यक असते, मात्र प्राध्यापकांकडून ते भानच हरपल्याने असे प्रकार घडत आहेत. ते अत्यंत गंभीर असून विद्यापीठ प्रशासनाने याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पेपरचे सील उघडल्यानंतर काही सेकंदातच तो व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झाल्याचे अनेक प्रकार उजेडात आले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियामुळे प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे याच्या वापरावर अनेक बंधने आणली जात आहेत. त्याचबरोबर नाशिकमधील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्याचाही धक्कादायक प्रकार उजेडात आला होता. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून हे रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
 

अभ्यास मंडळांच्या निवडीमध्येच घोळ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला व सामाजिक शास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळांवर ज्या प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात झाल्या, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर त्यामध्ये काही जुजबी बदल करून पुन्हा नवीन अभ्यास मंडळांवरील यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र या निवडी करताना जाणीवपूर्वक जवळच्या प्राध्यापकांची निवड करण्यात आली. त्यातून गुणवत्ता डावलली गेल्याने अशा प्रकारे व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो टाकण्याचे प्रकार घडत असल्याची टीका केली जात आहे.


एका महाविद्यालयातील एकाच विषयाचे ४ पेपरसेटर
प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या प्राध्यापकांची निवड करताना ग्रामीण, शहरी भागातील प्राध्यापक यांचे संतुलन राखून त्यांची निवड होणे अपेक्षित असते. मात्र प्रश्नपत्रिका काढण्यासाठी एकाच महाविद्यालयातील एकाच विषयाच्या ४ प्राध्यापकांची निवड करण्यात आल्याचे दिसून येत आहे. हा प्रकारही धक्कादायक असल्याची भावना त्या विषयाच्या प्राध्यापकांनी व्यक्त केली.
 

चौकशी करू
अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी पेपर सेट करायला गेलो असल्याचे फोटो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकल्याच्या प्रकरणाची माहिती घेतली जाईल. यामध्ये काही चुकीचे झाले असेल तर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- डॉ. एन. एस. उमराणी,
प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Dancers of papersets on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे