गाड्या चोरणारा सराईत ‘डॉन’ जाळ्यात
By admin | Published: May 11, 2017 04:53 AM2017-05-11T04:53:11+5:302017-05-11T04:53:11+5:30
अधिकाऱ्यांनाच फोन करून ‘डॉन को पकडना मुश्कीलही नहीं नामुमकीन है’, असे जाहीर आव्हान देत गाड्या चोरणारा सराईत गुन्हेगार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अधिकाऱ्यांनाच फोन करून ‘डॉन को पकडना मुश्कीलही नहीं नामुमकीन है’, असे जाहीर आव्हान देत गाड्या चोरणारा सराईत गुन्हेगार अखेर पुणे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मुंबई, जालना, बुलडाणा पोलिसांना चकवा देणाऱ्या या गुन्हेगाराला साथीदारासह गुन्हे शाखा युनिट १च्या टीमला अटक करण्यात यश मिळाले. १००च्या आसपास त्याने गाड्या चोरल्या असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सय्यद शकील सय्यद युसूफ
(रा. जवाहरनगर इक्बाल चौक, बुलडाणा) व त्याचा साथीदार महमंद एजास जलालुद्दीन काझी (वय ४९, रा. मुर्गीनाला, टुटी मझीससमोर, चेलिपुरा औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चिंचवडमध्ये फिर्यादीकडून पहिला गुन्हा नोंदविल्यानंतर त्याचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू झाला. पुण्यासह मुंबई, जालना येथील चारचाकी गाड्या चोरणारे दोघे जुना बाजार शिवाजी स्टेडियम येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांना पकडल्यावर चौकशीमध्ये सय्यद शकील सय्यद युसूफ याने चिंचवड पोलीस स्टेशन येथील एक इनोव्हा गाडी चोरून ती हैदराबादला विकल्याचे सांगितले, पुणे, मुंबई, जालना, जळगाव येथून एकूण १० इनोव्हा गाड्या चोरल्याचे समोर आले.
गेल्या दीड वर्षापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मुंबई पोलिसांना त्याने फोनवरून आपणाला पकडून देण्याचे आवाहन दिले होते.
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ चे सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, गजानन सोनुने, संभाजी भोईटे, रवींद्र कदम, शशिकांत शिंदे, मेहबुब मोकाशी, उमेश काटे, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले, कैलास गिरी, रिजवान जिनेडी, तुषार खडके, सुधाकर माने, प्रकाश लोखंडे, सुभाष पिंगळे, अशोक माने, श्रीकांत वाघवले यांनी कारवाई केली.