दौंडकरांना मिळणार हक्काचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:12 AM2018-09-21T01:12:18+5:302018-09-21T01:12:21+5:30
अनेक वर्षांपासून दौंडच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी संघर्ष सुरू होता.
खोर : अनेक वर्षांपासून दौंडच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी संघर्ष सुरू होता. मात्र, हा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच दौंड तालुक्यातील दुष्काळी भागाला या आपल्या हक्काच्या पाण्याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, माळवाडी ही गावे दर वर्षीच उन्हाळा तोंडावर आला, की पाणीटंचाईने भरडली जातात.
दुष्काळ सहन करणे व पाण्याच्या संघर्षाला तोंड देणे ही कायमस्वरूपी परंपरा या भागातील शेतकरी
वर्गाची होत होती. मात्र, आता ही टंचाईची परिस्थिती लवकरच आटोक्यात येणार असून, कार्यान्वित असलेल्या जनाई-शिरसाई व पुरंदर योजनेतून या दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे.
मुंबई येथे सिंचन भवनात दौंडच्या पाणीप्रश्नावर बैठक घेण्यात आली. या वेळी खोरचे सरपंच सुभाष चौधरी, देऊळगावगाडाचे माजी सरपंच डी. डी. बारवकर, दिलीप डोंबे, विजय कुदळे, राहुल चौधरी, भानुदास डोंबे तसेच पाणी योजनेचे अधीक्षक अभियंता व अधिकारी वर्ग उपस्थित होता. या वेळी दौंड तालुक्यातील खोर, देऊळगावगाडा या गावांना पाणी सोडण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.
कार्यान्वित पुरंदर जलसिंचन उपसा योजनेच्या कार्यक्षेत्रात डोंबेवाडी पाझर तलाव हा येत नसल्याने पाणी सोडण्यात मोठी अडचण येत होती. पुरंदर जलसिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रात डोंबेवाडी पाझर तलाव हा घेण्यात यावा व बंदिस्त पाईपलाईनची योजना होऊन खोर व देऊळगावगाडा या गावांना पाणी मिळावे म्हणून बैठकीत निर्णय घेण्यात आलेला असून त्याचा प्रशासन विभागाकडे प्रस्तावदेखील सादर केला आहे. लवकरच या योजनेच्या माध्यमातून पाणी मिळणार आहे.
>दोन दिवसांपूर्वी आमदार राहुल कुल यांनी खोरला पाणीप्रश्नासंदर्भात दौरा केला होता. या वेळी जनाई-शिरसाई योजनेच्या माध्यमातून खोरच्या पद्मावती व फडतरेवस्ती तलावात शेतकºयांना लोकवर्गणी भरूनदेखील पाणी सुटण्याची वाट पाहावी लागली होती. या वेळी राहुल कुल यांनी जनाई योजनेच्या अधिकारीवर्गाला चांगलेच धारेवर धरले आहे. ‘जनाई-शिरसाई योजनेला जे पाणी जाते, ते दौंडचे आहे. आमचेच पाणी आमच्याच लोकांना पैसे भरूनदेखील मिळणार नसेल, तर जनाई-शिरसाई योजनेला जाणारे पाणी दौंडमधून बंद करू,’ असा इशारा राहुल कुल यांनी सिंचन योजनेच्या अधिकाºयांना दिला. त्यानुसार जनाई-शिरसाई योजनेतून खोरच्या पद्मावती तलावात पाणी सोडण्यात आले असून फडतरेवस्ती तलावातदेखील आता पाणी लवकरच पोहोचणार आहे. दौंडच्या जनतेचे हक्काचे पाणी असूनदेखील वारंवार हक्क डावलला जात असेल, तर दौंडची जनता ही गप्प बसणार नाही, असे खडे बोल आमदार कुल यांनी सुनावले आहेत.