दौंडकरवाडी रस्ता उखडला; निकृष्ट कामामुळे अवघ्या सहा महिन्यांत पडले खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 02:54 AM2018-08-24T02:54:55+5:302018-08-24T02:55:15+5:30
३ किलोमीटर अंतराचा रस्ता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ६ महिन्यांत उखडला आहे.
दावडी : दावडी ते दौंडकरवाडी हा नव्याने तयार करण्यात आलेला ३ किलोमीटर अंतराचा रस्ता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ६ महिन्यांत उखडला आहे. या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.
यामुळे डांबरीकरणाच्या कामातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून त्याचे पुन्हा डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दावडी ते दौंडकरवाडी रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण अनेक वर्षे करण्यात आलेले नव्हते. सहा महिन्यांपूर्वी दुरुस्तीअंतर्गत ६८ लाख रुपये निधी मंजूर झाला होता.
या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. चार ते पाच महिन्यांच्या आतच या रस्त्यावर खड्डे पडून डांबरीकरण उखडू लागले आहे. या रस्त्यावर सातत्याने खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत. यंदा या परिसरात मोठा पाऊस झाला नसतानाही या रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहे. अनेक ठिकाणी खचला व उखडला आहे. साईडपट्ट्यांच्या बाजूचे डांबर मोठ्या प्रमाणावर उखडले आहे. काही ठिकाणी रस्त्याला भेगा पडून खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.
रस्त्याचे निकृष्ट काम
रस्ता चांगला व्हावा म्हणून ग्रामस्थांनी शासनदरबारी वर्षानुवर्षे हेलपाटे मारायचे, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांना भेटून कामाचा पाठपुरावा करायचा आणि प्रत्यक्षात काम मंजूर झाले, की ठेकेदाराने कमी खर्चात निकृष्ट काम करून कमाई करायची आणि पुन्हा एकदा त्याच ग्रामस्थांना लाल फितीच्या कारभाराच्या चक्रव्यूहात अडकवून नामानिराळे राहायचे, हे कुठे तरी थांबायला हवे. त्यासाठी संबंधित रस्त्याची नि:पक्षपातीपणे गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी दावडीचे माजी सरपंच सुरेश डुंबरे, मारुती बोत्रे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
दौंडकरवाडी-दावडी या
३ किलोमीटर रस्त्याचे नव्याने
६ महिन्यांपूर्वी करण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जामुळे संपूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण पहिल्याच पावसात उखडले आहे. रस्ता तयार करून काही महिने होत नाहीत तोच रस्त्यावर खड्डे पडले आहेत.