दांडेकर पुलावरील खूनाचे गूढ उकलले
By admin | Published: April 22, 2015 05:40 AM2015-04-22T05:40:24+5:302015-04-22T05:40:24+5:30
हरवलेल्या चुलत्याचा पत्ता सांगत नाही, म्हणून एकाला दारू पाजून गळ्यावर आणि पोटात वार करून त्याचा मृतदेह कालव्यात टाकून देण्यात आला होता
पुणे : हरवलेल्या चुलत्याचा पत्ता सांगत नाही, म्हणून एकाला दारू पाजून गळ्यावर आणि पोटात वार करून त्याचा मृतदेह कालव्यात टाकून देण्यात आला होता. गेल्या आठवड्यात दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना स्वारगेट पोलिसांनी उघडकीस आणली. खुनाचे गूढ उकलत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली.
सूरज नंदू उत्तेकर (वय २१, रा. १३०, दांडेकर पुल), किरण बापू मिसाळ (वय १३३, आंबिल ओढ़ा कॉलनी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दोघांनी संभाजी दादाराम ओहाळ (वय ४२, रा. लातूर) यांचा खून केला होता. आरोपींना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. वरिष्ठ निरीक्षक निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओहाळ हे मुळचे लातूरचे होते. त्यांची बहिण सिंहगड रस्त्यावर राहण्यास आहे तर भाऊ दांडेकर पुलावर राहतो. ओहाळ सध्या या दोघांकडे येऊन जाऊन राहत होते. आरोपी सूरज याचा चुलता हरवलेला आहे. त्याचा पत्ता ओहाळ यांना माहिती होता असे त्यांनी आरोपींना सांगितले होते.
परंतु, ते पत्ता सांगत नव्हते. त्यामुळे आरोपींनी त्यांना १० एप्रिल रोजी रात्री दारू प्यायला सोबत नेले. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कालव्याशेजारी दारूपित बसलेले होते. त्यावेळी सूरज याने पुन्हा चुलत्याचा पत्ता विचारला. परंतु ओहाळ यांनी पत्ता सांगण्यास नकार दिला. त्यावेळी चिडलेल्या आरोपींनी ओहाळ यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर बियरची बाटली फोडून काचेने पोटात भोसकले. खून केल्यानंतर त्याचे कपडे काढून मृतदेह कालव्यात फेकून दिला होता.