सवाईच्या रसिकांसाठी ‘दंडगाणे’, वाहतूक पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 05:40 AM2017-12-17T05:40:13+5:302017-12-17T05:40:21+5:30
वाई गंधर्व महोत्सवातील गाणे ऐकायला आलेल्या रसिकांना वाहतूक शाखेने दंडाचा दणका दिला. महर्षी शिंदे पुलावर आपली चारचाकी वाहने लावून जाणा-या गानरसिकांची वाहने वाहतूक शाखेने जॅमर लावून जॅम केली.
पुणे : सवाई गंधर्व महोत्सवातील गाणे ऐकायला आलेल्या रसिकांना वाहतूक शाखेने दंडाचा दणका दिला. महर्षी शिंदे पुलावर आपली चारचाकी वाहने लावून जाणा-या गानरसिकांची वाहने वाहतूक शाखेने जॅमर लावून जॅम केली. एक दोन नव्हे, तर ६० पेक्षा अधिक वाहनांना जॅमर लावण्यात आले. त्यासाठी खास पोलीस कर्मचारी बोलावून घेण्यात आले होते.
रमणबाग प्रशालेत होणा-या या महोत्सवाला असंख्य गानरसिक गर्दी करतात. दुपारी सुरू होणाºया गानमैफली रात्री उशिरापर्यंत रंगतात. रसिकांनी आपली वाहने लावण्यासाठी या परिसरात पुरेशी जागा नाही. अधिकृत वाहनतळ नाही. त्यामुळे बहुसंख्य रसिक आपली वाहने रमणबाग प्रशालेच्या जवळच असणाºया महर्षी शिंदे पुलाच्या दोन्ही बाजूंना लावतात व गाणे ऐकण्यासाठी जातात. आसपासच्या नागरिकांना या अघोषित वाहनतळाचा बराच त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींनी वाहतूक शाखेकडे तक्रार केली. वाहतूक शाखेने पोलिसांना तिथे जाण्यास सांगितले. त्यांनी वाहनांची संख्या पाहिल्यावर जॅमर व जादा कर्मचारी बोलावून घेतले व ६० पेक्षा अधिक वाहनांच्या पुढच्या चाकाला ते लावून टाकले. सायंकाळी ५ ते ६ च्यादरम्यान ही कारवाई झाली.
त्या वेळी वाहने लावलेल्या सर्वच रसिकांची आतमध्ये गानसमाधी लागली होती. त्यानंतर रात्री ८ वाजता काही वाहनधारक घरी जायचे, म्हणून आल्यावर त्यांना वाहने जॅम झाल्याचे दिसले. रात्री साडेनऊपर्यंत पोलिसांनी १८ वाहनधारकांकडून प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल केला होता.