महाविद्यालयांत दांडीबहाद्दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:12 AM2017-08-18T01:12:02+5:302017-08-18T01:12:04+5:30
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थितीत दिवसेंदिवस घटत चालली आहे.
पुणे : कालबाह्य झालेले अभ्यासक्रम, प्राध्यापकांच्या अध्यापनाच्या जुन्या पद्धती, तोंडी परीक्षांसाठी सरसकट वाटले जाणारे गुण, खोटी उपस्थिती दाखवून विद्यार्थ्यांना दिली जाणारी सुट यासह अनेक कारणांमुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांच्या वर्गातील उपस्थितीत दिवसेंदिवस घटत चालली आहे. वर्ग सुरू, मात्र विद्यार्थीच नाहीत हे वास्तव पुण्यातील बहुतेक महाविद्यालयांत ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत अधिक आहे. त्यातही विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया पुणे शहरात राज्यभरातून व राज्याबाहेरून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. तसेच, स्पर्धा परीक्षांचे केंद्र अशीही एक ओळख पुण्याने निर्माण केली आहे. त्यामुळे शहरातील नामांकित महाविद्यालयांसह मध्यम व सर्वसामान्य महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होते. प्रवेशक्षमता संपल्यामुळे महाविद्यालयांनी विद्यापीठाकडून १० टक्के वाढीव विद्यार्थ्यांची मागणी केली आहे. शहरातील बहुतांश सर्वच महाविद्यालयांना वाढीव विद्यार्थी मंजूर करण्यात आले आहेत. गेल्या महिनाभरापासून महाविद्यालयीन वर्ग सुरळीतपणे सुरू झाले आहेत; मात्र कला विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी वर्गात उपस्थित नाहीत. तसेच, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती काही प्रमाणात बरी असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.
केवळ वर्गात बसून शिक्षण घेता येत नाही, तर वर्गाबाहेरही माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध विषयांचे ज्ञान मिळवता येत आहे. बुक्सच्या माध्यमातून आॅनलाइन अभ्यासक्रम शिकवले जात आहेत; तसेच अनेक विषयातील ज्ञान इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे प्राध्यापकांकडून वेगळे ज्ञान मिळण्याची विद्यार्थ्यांना अपेक्षा असते; मात्र विद्यार्थ्यांची अपेक्षा पूर्ती होत नाही. हेसुद्धा अनुपस्थितीचे प्रमाण वाढण्याचे एक कारण आहे.
>पारंपरिक अभ्याक्रमांना आव्हान
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे निश्चित केलेले नसते. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन केवळ पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला असल्याचे दिसून आले. प्राध्यापकांकडून चांगल्या पद्धतीने शिकवले जात नाही. कला शाखेच्या विषयांचा अभ्यास घरी बसून केला, तरीही सहज उत्तीर्ण होता येते. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची गरज असल्याने महाविद्यालयाकडून प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना उत्तीर्णच केले जाते. त्यामुळे नियमितपणे वर्गात बसले नाही तरी चालते, अशा प्रतिक्रिया शहरातील काही नामांकित महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दिल्या.
>विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती लावण्याचा प्रकार अनेक महाविद्यालयाकडून होत आहे. तसेच, कला अभ्यासक्रमांमध्ये वेळीच बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कॉलेजमध्ये न जाताही ७० टक्के गुण प्राप्त होतात, अशी विद्यार्थ्यांची मानसिकता तयार झाली आहे. कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्रथम वर्षाच्या तुकड्या ४ असतात; मात्र द्वितीय वर्षात त्या केवळ दोन होतात. द्वितीय व तृतीय वर्षाच्या 120 च्या तुकडीतील केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच विद्यार्थी वर्गात उपस्थितीत असल्याचे दिसून येते. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे.
- प्रा. नंदकुमार निकम, शिक्षणतज्ज्ञ
>महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे. मी स्वत: काही महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांशी व प्राध्यापकांशी चर्चा केली. त्यात प्राध्यापकांच्या अध्यापन पद्धतीबाबत काही विद्यार्थी नाराज असल्याचे दिसून आले. मात्र, वर्गात विद्यार्थीच बसले नाही, तर पुस्तकी ज्ञानाबरोबरच शिक्षकांकडील अनुभवातून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनाच्या लाभापासून सुद्धा हे विद्यार्थी मुकणार आहेत. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे.
- डॉ. प्र. चिं. शेजवलकर,
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ