दांडीबहाद्दर डॉक्टरांनी उडविली आरोग्यसेवेची ‘दांडी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 02:09 AM2018-07-25T02:09:22+5:302018-07-25T02:09:45+5:30
न कळविताच गैरहजर राहणाऱ्यांमुळे आरोग्य विभागाची वाढली डोकेदुखी
- विशाल शिर्के
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाला रिक्त पदांची अवकळा आलेली असताना कार्यालयाला न कळविता गैरहजर राहणाºया वैद्यकीय अधिकाºयांमुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. आरोग्य विभागाचे तब्बल १७ अधिकारी एक ते १४ वर्षांपासून कार्यालयाला न सांगताच गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. असे असतानाही आरोग्य विभागाकडून काही व्यक्तींवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
महापालिकेच्या आरोग्य विभागाची १ हजार ६६३ पदे मंजूर आहेत. त्यातील एक ते चार या श्रेणीतील ६६३ पदे मंजूर असून, तब्बल ५१८ पदे रिक्त आहेत. आयसीयू फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, निरीक्षक हिवताप, कनिष्ठ प्रयोगशाळा तज्ज्ञ, कीटक संघटक, शस्त्रक्रिया विभागातील सहायक अशा विविध २० संवर्गांतील पदे रिक्त आहेत.
या रिक्त पदांपैकी तब्बल २२ पदे ही एमबीबीएस पदवीधारक वैद्यकीय अधिकाºयांची आहेत. मनुष्यबळाअभावी आणि तज्ज्ञ डॉक्टरांअभावी येणाºया अडचणी आरोग्य अधिकाºयांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. रिक्त पदांमुळे अधिकारी हैराण झालेले असताना, कामावर काही वर्षे गैरहजर राहणाºयांना वैद्यकीय अधिकाºयांमुळे आरोग्य विभागाचे दुखणे वाढले आहे.
विशेष म्हणजे, हे अधिकारी कार्यालयाला कोणतीही माहिती न कळविता वर्षानुवर्षे गैरहजर आहेत. त्यानंतरही अजून कोणत्याही व्यक्तीवर महापालिकेने प्रत्यक्ष कारवाई केलेली नाही. यातील केवळ ४ व्यक्तींचे धारणाधिकार संपुष्टात आणण्याची कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर महापालिकेने दिले आहे.