पक्षाच्या सत्कार कार्यक्रमालाच दांडी

By admin | Published: March 20, 2017 04:44 AM2017-03-20T04:44:19+5:302017-03-20T04:44:19+5:30

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाकडे बहुसंख्य नगरसेवक, आमदार व खासदारांनी पाठ फिरविल्याचे

Dandi is the party's felicitation program | पक्षाच्या सत्कार कार्यक्रमालाच दांडी

पक्षाच्या सत्कार कार्यक्रमालाच दांडी

Next

पुणे : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाकडे बहुसंख्य नगरसेवक, आमदार व खासदारांनी पाठ फिरविल्याचे रविवारी दिसून आले. खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर व बहुतांश नगरसेवक पक्षाच्या घरच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे गटबाजीला उधाण झाल्याचे चित्र दिसून आहे.
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने ‘सन्मान युवा शक्तीचा : प्रारंभ पारदर्शक प्रशासनाचा’ या कार्यक्रमांतर्गत युवा नगरसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, शहराध्यक्ष योगेश गोगावले, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, सरचिटणीस गणेश घोष, युवा मोर्चा शहराध्यक्ष दीपक पोटे आदी
उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी गिरीश बापट व जगदीश टिळेकर यांचा अपवाद वगळता इतर खासदार, आमदार यांना प्रोटोकॉलनुसार निमंत्रण न देता केवळ उपचार म्हणून एसएमएस पाठविण्यात आला. त्यामुळे विशिष्ट गटाचा कार्यक्रम असे स्वरूप याला प्राप्त झाल्याने खासदार, आमदार व त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा शहरामध्ये रंगली आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी दिसून आली होती. त्यानंतर ९८ नगरसेवक निवडून आणत पक्षाने मोठे यश मिळविले आहे. मात्र या विजयानंतरही पक्षातील गटबाजीने जोर धरला असल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजयुमोचे शहराध्यक्ष दीपक पोटे यांनी याबाबत सांगितले की, ‘‘युवा मोर्चाच्या वतीने ३० युवा नगरसेवकांना सत्काराच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते, त्यापैकी २५ नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. अधिवेशन सुरू असल्याने आमदारांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते. कार्यक्रमासाठी टिळक स्मारक मंदिर कार्यकर्त्यांनी तुडुंब भरले होते. भारतीय जनता युवा मोर्चा हा कुठलाही गट तट मानत नाही, भाजपा हाच आमचा एकमेव गट आहे.’’
दरम्यान, कार्यक्रमात बोलताना गिरीश बापट म्हणाले, ‘‘सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पुढे अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठीच केंद्रात, राज्यात आणि पालिकेत भाजपाच्या उमेदवारांना नागरिकांनी निवडून दिले आहे. मतदारांनी आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे मतदारांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी विकासकामांची जबाबदारी पार पाडावी.’’
मुक्ता टिळक, योगेश गोगावले, योगेश टिळेकर, श्रीनाथ भिमाले, गणेश घोष, सिद्धार्थ शिरोळे यांनी या वेळी विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Dandi is the party's felicitation program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.