पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांकडून कॉलेजला ‘दांडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:12 AM2021-02-16T04:12:23+5:302021-02-16T04:12:23+5:30

पुणे : कोरोनामुळे तब्बल अकरा महिन्यानंतर शहरातील व ग्रामीण भागातील महाविद्यालये सोमवारी सुरू झाली झाली. मात्र, बहुतांश महाविद्यालयांमध्ये २० ...

'Dandi' from students on the first day | पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांकडून कॉलेजला ‘दांडी’

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांकडून कॉलेजला ‘दांडी’

Next

पुणे : कोरोनामुळे तब्बल अकरा महिन्यानंतर शहरातील व ग्रामीण भागातील महाविद्यालये सोमवारी सुरू झाली झाली. मात्र, बहुतांश महाविद्यालयांमध्ये २० ते ३० टक्के विद्यार्थ्यांनीच उपस्थिती लावली. परिणामी काही निवडक महाविद्यालये वगळता अनेक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची थाेडीफार संख्या पाहायला मिळाली. त्यातही केवळ विज्ञान शाखेचे विद्यार्थी प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयात आले असल्याचे दिसून आले.

राज्य शासनाने महाविद्यालये सुरू करण्यास परवागनी दिल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश शिक्षण संस्थाचालकांनी सोमवारपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील फर्ग्युसन, मॉडर्न, वाडिया, स. प. महाविद्यालय आदी नामांकित महाविद्यालयांसह ग्रामीण भागातील महाविद्यालयेसुद्धा सुरू झाली. परंतु, काही महाविद्यालयांनी ऑफलाइनबरोबरच ऑफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवले. तर ब-याच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना केवळ प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयात बोलवले होते.त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थिती अपेक्षेपेक्षा कमी होती.

महाविद्यालये सुरू झाली असली तरी अद्याप वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर त्याचा परिणाम झाला. कोरोनामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी अनेक महिने एकमेकांना भेटू शकले नाही. त्यामुळे महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थी एकमेकांची विचारपूस करताना आणि गप्पा- मारताना दिसले. तर काही विद्यार्थी आपल्या मित्रांबरोबर सेल्फी काढत असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे दररोज महाविद्यालयात यावे लागणार असल्याने काहींनी बोनाफाईड सर्टिफिकिटसाठी व शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर रांगा लावल्याचे चित्रही दिसून आले.

पुणे जिल्ह्यात पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची एकूण संख्या १७७ असून अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या ७७ आहे. तसेच शिक्षणशास्त्र, विधी, फार्मसी, आर्किटेक्चर महाविद्यालयांची संख्याही मोठी आहे. मात्र, सोमवारी सर्व महाविद्यालये सुरू होऊ शकली नाहीत.

--------------------------------------------------

जिल्ह्यातील पारंपरिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची आकडेवारी

तालुका महाविद्यालयांची संख्या

पुणे शहर ७४

पिंपरी चिंचवड २७

आंबेगाव ४

इंदापूर ९

खेड ८

जुन्नर ८

दौंड ६

पुरंदर २

बारामती ६

भोर २

मावळ ७

मुळशी ३

वेल्हा १

शिरूर ७

हवेली १२

-------------------------------

ऑफलाइन शिक्षणाला मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना काही विषय घरी बसून समजत नव्हते. महाविद्यालये सुरू झाल्यामुळे आता प्रत्यक्षात वर्गात बसून सर्व विषय सहज समजू शकतील. आता परीक्षेपूर्वी सर्व अभ्यासक्रम पूर्ण होईल. त्यामुळे परीक्षा देताना आम्हा विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

- प्राची बांगर, विद्यार्थीनी

-----------------------------

कोरोनानंतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली होती. वरिष्ठ महाविद्यालये केव्हा सुरू होणार याची सर्व विद्यार्थी वाट पाहत होतो. अखेर सोमवारी महाविद्यालये सुरू झाल्याने सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंद होत आहे.

- सौरभ निर्मल, विद्यार्थी

---------------------------

विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षणाचा कंटाळा आला होता. नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

- शुभम होडे, विद्यार्थी

-----------------------

शहरातील काही नामांकित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मास्कशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. तसेच विद्यार्थ्यांना सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी विनामास्क फिरत होते. तसेच फिजिकल डिस्टंन्सिंगचे नियम पाळत नसल्याचे दिसत होते.

--------------

पहिल्याच दिवशी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती होती. सध्या प्रात्यक्षिक सुरू करण्यात आले असून ऑफलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

- डॉ. संजय खरात, प्राचार्य, मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड

Web Title: 'Dandi' from students on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.