दांडीया, गरबाचे महिला घेताहेत धडे, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मोठा प्रतिसाद
By admin | Published: September 30, 2016 11:05 PM2016-09-30T23:05:44+5:302016-09-30T23:05:44+5:30
नवरात्री म्हटले की शहरात ठिकठिकाणी दांडीया आणि गरबा यांच्या कार्यक्रमाला उधाण येते. एका विशिष्ट वर्गाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नृत्य प्रकाराचा आनंद घेण्यासाठी
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३३ : नवरात्री म्हटले की शहरात ठिकठिकाणी दांडीया आणि गरबा यांच्या कार्यक्रमाला उधाण येते. एका विशिष्ट वर्गाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नृत्य प्रकाराचा आनंद घेण्यासाठी समाजातील सर्वच जाती-धर्माच्या तरुणांबरोबरच मध्यमवयीनांचीही मोठी पसंती असल्याचे दिसते. नवरात्रीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या या नृत्य प्रकाराचे धडे घेण्यालाही महिला तसेच पुरुष वर्ग प्रशिक्षणासाठी गर्दी करत असल्याचे दिसते.
शहरातील विविध मंगल कार्यालये, लॉन्स नवरात्रीच्या निमित्ताने होणाऱ्या या दांडिया व गरबाच्या कार्यक्रमांनी फुल्ल झाले आहेत. अनेक जण हे प्रशिक्षण शुल्क भरुन घेत आहेत तर काही समाजाच्या संस्था किंवा इतर संस्थांमार्फत हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अनेक सोसायट्या किंवा घरगुती स्तरावरही हे महिला आणि तरुणी हे दांडीयाचे धडे घेत असल्याचे शहरात ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.
या खेळांतून भारतीय परंपरा जपली जात असून महिलांमध्ये या प्रशिक्षणासाठी मोठा उत्साह असल्याचे दिसून येत आहे. याबाबत माहिती देताना पूना लोहाणा महाजन संस्थेच्या कार्यकारणी सदस्य कृती नागरेचा म्हणाल्या, समाजातर्फे मागील अनेक वर्षांपासून मोफत दांडिया आणि गरब्याचे प्रशिक्षण देत आहोत. नवरात्रीच्या काळात ठिकठिकाणी होणाऱ्या स्पर्धांमध्ये समाजातील मुलींना सहभागी होता होऊन बक्षिसास पात्र होता यावे यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येते.
सध्या व्यावसायिक प्रशिक्षक एका महिन्याच्या १२ ते १६ जणांना प्रशिक्षण देण्यासाठी १८ ते २० हजार रुपये आकारण्यात येतात. यातही महिन्यातून केवळ ५ ते ६ वेळा हे प्रशिक्षण देण्यात येते. याशिवाय नवरात्रादरम्यान ठिकठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या सामुहीक दांडीया कार्यक्रमांसाठीही प्रत्येकी ३०० ते ५०० रुपये शुल्क आकारण्यात येते असेही त्या म्हणाल्या.
दरवर्षी दांडीया आणि गरबा याच्या स्टेप्समध्ये नव्याने भर पडत असल्याने या स्टेप्स समाजातील मुलींना माहीत व्हाव्यात आणि त्या या कार्यक्रमातील स्पर्धांमध्ये यशस्वी व्हाव्यात हा या प्रशिक्षणामागील मुख्य उद्देश असतो.