ओतूरमध्ये राखणदारावर बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:57 PM2018-05-15T17:57:31+5:302018-05-15T17:57:31+5:30
ओतूर तालुक्यातील घुलेपट-उंब्रज पांद येथे बाजरीच्या पिकांची रात्री राखण करणाऱ्या व्यक्तिवर बिबट्याने झोपेत असताना अचानक हल्ला केला.
ओतूर : ओतूर तालुक्यातील घुलेपट-उंब्रज पांद येथे बाजरीच्या पिकांची रात्री राखण करणाऱ्या व्यक्तिवर बिबट्याने झोपेत असताना अचानक हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तिचे नाव हनुमंत महादेव जाधव (रा.अहिनवेवाडी, ओतूर, ता.जुन्नर) असे आहे, अशी माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस.रघतवान यांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव महादेव नलावडे यांच्या बाजरीच्या पिकाचे राखण करण्यासाठी जाधव यांना ठेवले होते. मात्र, सोमवारी (दि.१४ मे) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ते पिकाशेजारीच झोपला असता बिबट्याने हल्ला चढवत त्यांच्या तोंडावर पंजे मारून जखमी केले. अशा अवस्थेत ते जीवाच्या आकांताने ओरडले.
तेथे जवळपास वनमजूर फुलचंद किसन खंडागळे होते. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून ते जाधव यांच्याजवळ आले. जखमीची अवस्था बघून त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना मोबाईल वरून कळविले. संदेश मिळाल्याने वनविभागाचे कर्मचारी एस.बी. महाले ,व्ही.आर अडागळे, एस.जी. मोमीन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी जाधव यांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.