गावे गडप होण्याचा धोका

By admin | Published: November 24, 2014 12:30 AM2014-11-24T00:30:56+5:302014-11-24T00:30:56+5:30

मावळ तालुक्यात काही वर्षांपासून धनिकांनी डोंगरच विकतच घेतले होते. ते पोखरून मोठ-मोठे प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली आहे

The danger of the future of the villages | गावे गडप होण्याचा धोका

गावे गडप होण्याचा धोका

Next

विलास भेगडे, तळेगाव दाभाडे
मावळ तालुक्यात काही वर्षांपासून धनिकांनी डोंगरच विकतच घेतले होते. ते पोखरून मोठ-मोठे प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली आहे. परंतु हे प्रकल्प डोंगराच्या पायथ्याशी असलेली अनेक गावे व वसाहती गडप करू शकतात. या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे.
मावळ तालुक्यात जमिनीला सोन्याचा भाव असल्याने मागील काही वर्षांमध्ये अतिक्रमण व बेकायदा खोदकामाच्या संख्येत वाढ झाली आहे. तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान मिळाले असल्याने पुणे - मुंबईच्या धनिकांचा मावळकडे ओढा आहे. सध्या मावळ तालुक्यात एजंट/दलालांचा सुळसुळाट आहे. जमीन खरेदी-विक्री प्रकरणात फसवणूक होणारच नाही, याची शाश्वती राहिलेली नाही.
यामुळे अशा गावांचे सर्वेक्षण करून शासन पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. १९८९ मध्ये म्हणजेच २५ वर्षांपूर्वी मावळातील भाजे गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३७ माणसांना जीव गमवावा लागला होता, तर देवघर येथे अशाच घटनेत दोन जण मृत्युमुखी पडले होते. नायगाव येथील डोंगरावरील दरड बुधवारी (दि. १९) कोसळून बांधकामावर काम करणाऱ्या विघ्नेश मेश्राम (वय २९) या कामगारास आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे डोंगर पोखरण्याचे प्रकार पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. मावळात दर वर्षी धो-धो पाऊस कोसळतो. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी हजारोच्या संख्येने पुणे-मुंबईचे पर्यटक लोणावळा-खंडाळा या भागासह पवन मावळ, आंदर मावळ, नाणेमावळातील डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटतात.
बंगलेवाल्यांनी
डोंगरावर बनविले रस्ते
पाले व करंजगावच्या डोंगरावर खासगी बंगले उभारण्यात आल्याने तेथेही रस्ते बनले आहेत. कादव, शिळीम, वाघेश्वर, तुंग, चावसर, येथे तसेच तिकोणा, लोहगड या किल्ल्यांखाली मोठमोठी हॉटेल, रिसॉर्ट व खासगी फार्महाऊस उभारले आहेत. त्यामुळे या भागात अधूनमधून मातीचे ढिगारे कोसळतात. डोंगराच्या कडांना भेगा पडतात. अर्धवट तुटलेले कडे व सुळके या गावांना धोकादायक आहेत. या गावात बहुसंख्य लोक आदिवासी व धनगर जमातीचे आहेत. काहींनी पूर्वीपासून थेट डोंगरावरच घरे उभारली आहेत.डोंगर ढासळला अथवा कडा कोसळल्यास डोंगरावर राहणाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते.
ग्रामीण भागातील मावळची लाल माती बागकामासाठी प्रसिद्ध आहे. तिचाही बेसुमार उपसा सुरू असल्याचे दिसून येते. डोंगरकडेची माती उपसल्याने पावसाळ्यात संपूर्ण डोंगरच जमीनदोस्त होण्यासारखी परिस्थिती मावळात अनेक ठिकाणी पहावयास मिळते.
मावळ तालुक्यातील बेकायदा खोदकाम व अनधिकृत बांधकामावर महसूल खात्याची करडी नजर आहे. दोषींवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येते.
कायद्याचे पालन करताना कोणाचाही मुलाहिजा न ठेवता खनिज संपत्तीचे जतन केले जाईल.
यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तालुक्यातील अनधिकृत बांधकाम व खोदकामास जलद आळा घालण्यासाठी नागरिकांनी जागृत राहून महसूल खात्याला सहकार्य करावे,असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी लोकमतशी बोलताना केले.

Web Title: The danger of the future of the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.