कबुतरांची वाढती संख्या धोक्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 04:14 AM2018-07-27T04:14:22+5:302018-07-27T04:14:49+5:30
‘फंगस इन्फेक्शन’ होण्याचे प्रमाण वाढले
पुणे : नागरिकांमध्ये असलेले गैरसमज व चुकीच्या प्रथांमुळे कबुतरांना धान्य टाकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे गेल्या वर्षभरात पुण्यात कबुतरांच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ झाली असून, पुणेकरांच्या आरोग्यासाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात दिला आहे. यंदा प्रथमच महापालिकेने शहरातील विविध समस्यांमध्ये कबुतरांचा समावेश केला आहे.
पुणे शहरात गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने ओंकारेश्वर मंदिर परिसर, सारसबाग, नदीपात्र रस्ता, केईएम हॉस्पिटल या भागासह उपनगरांमध्ये देखील काही भागांमध्ये कबुतरांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती पर्यावरण अहवालात नोंदवली आहे. पुणेकरांकडून काही चुकीच्या प्रथांमुळे कबुतरांना खायला धान्य टाकले जाते. परंतु यांचे विपरीत परिणाम शहराच्या आरोग्यावर होत आहे. शहरातील उच्च इमारतीच्या गच्ची, दाट वस्तीत व अडगळीच्या ठिकाणी कबुतरांचा वावर वाढला आहे. यामुळे गेल्या एक-दोन वर्षांत कबुतरांच्या विष्ठेमुळे पुणेकरांना ‘फंगस इन्फेक्शन’ होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. तसेच पिसांमुळे श्वसनाचे विकार आणि अस्थमाचे रुग्णदेखील वाढत असल्याचे सर्वेक्षण नोंदविले आहे. तसेच कबुतरांच्या विष्ठेच्या उग्र वासामुळेदेखील पुणेकर प्रचंड त्रस्त झाले आहेत.
फुप्फुसाच्या विकारांमध्येही वाढ
कबुतरांची पिसे व विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतूंमुळे ‘हायपर सेन्सिटिव्ह न्युमोनिया’ हा आजार होण्याचे प्रमाण पुण्यात वाढले आहे. या शिवाय फुप्फुसाचे इतरही आजार बळावत असून यात फुप्फुसाचा आकार कमी होणे, शरीराला आॅक्सिजन कमी मिळणे, धाप लागणे, वेळप्रसंगी व्हेंटिलेटरवर लावण्याची देखील वेळ येत असल्याचे अहवालामध्ये स्पष्ट केले आहे.