पाले नामा गावात ‘माळीण’चा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:38 AM2017-08-18T01:38:04+5:302017-08-18T01:38:06+5:30
नाणे मावळातील पाले नामा या गावाच्या वरच्या भागावर डोंगराचा भाग काही दिवसांपासून खचत चालला आहे.
कामशेत : नाणे मावळातील पाले नामा या गावाच्या वरच्या भागावर डोंगराचा भाग काही दिवसांपासून खचत चालला आहे. याठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. डोंगराचा हा भाग ढासळण्याच्या स्थितीत असून, नाणे मावळातील या गावाचेही माळीण होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीत असलेल्या पाले नामा या गावाच्या वरील बाजूला डोंगराची मोठी रांग आहे. या डोंगराच्या पायथ्याच्या एका बाजूला पाले नामा हे ४४२ लोकसंख्येचे गाव आहे. खालच्या बाजूला जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा असून, या शाळेत गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेजवळ काही घरेही आहेत. दुर्गम गावाच्या दुसºया बाजूला वडिवळे धरण परिसर असल्याने या भागात पावसाचे प्रमाण खूप असते.
गावच्या वरच्या भागातील डोंगराचा मोठा भाग मागील काही दिवसांपासून खचत चालला आहे. डोंगराच्या सपाट भागाला मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी भेगा पडल्या असल्याने हा भाग कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे माळीणची पुनरावृत्ती होण्याची भीती वर्तवली जात आहे.
>तहसीलदार : वेळीच कार्यवाहीच्या सूचना
डोंगराचा काही भाग खचला आहे, याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाला दिली आहे. डोंगराच्या खालच्या बाजूला शाळा व काही घरे असल्याने त्यांना धोका निर्माण होऊन माळीणसारखी परिस्थिती होऊ शकते म्हणून वेळीच उपाययोजना करण गरजेचे आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दिल्या आहेत.
>बांधकाम विभागाच्या अधिकाºयांकडून पाहणी
जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पाटील व शिंदे हे सोमवारी सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता सुभाष क्षीरसागर यांनी दिली. येत्या दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
>पाले नामा गावाच्या वरील डोंगराच्या भागात भेगा पडल्याने तसेच
याचा गाव व शाळा यांना धोका होऊ नये. या संबंधीचा सर्व्हे करण्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर उपाययोजना तातडीने करण्याची खबरदारी घेण्यात येणार आहे. - रणजित देसाई, तहसीलदार, मावळ