सिंधू, मोहेंजोदडो संस्कृतीला पोहोचतोय धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 12:31 AM2018-04-09T00:31:21+5:302018-04-09T00:31:21+5:30
एका नव्या संशोधनातून प्राचीन सिंधू संस्कृती आणि हडप्पा- मोहेंजोदडो ही शहरे साडेपाच हजार वर्षांपूर्वीची नसून, आठ हजार वर्षांंपूर्वीची असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
- नम्रता फडणीस
पुणे : एका नव्या संशोधनातून प्राचीन सिंधू संस्कृती आणि हडप्पा- मोहेंजोदडो ही शहरे साडेपाच हजार वर्षांपूर्वीची नसून, आठ हजार वर्षांंपूर्वीची असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. परंतु सद्यस्थितीत जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेली मोहेंजोदडो ही साइट धोक्यात सापडली आहे. साइटचे संवर्धन कसे करायचे यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू वसंत शिंदे यांनी मार्गदर्शन केले आहे.
भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे संबंध असले तरी जागतिक वारसा म्हणून नोंद झालेल्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील ‘मोहेंजोदडो’ या स्थळाच्या संवर्धनासाठी भारताला मदतीची साद घालण्यात आली. राजकीय पटलावर एकमेकांचे शत्रू मानल्या जाणाऱ्या या दोन देशांमध्ये कला-संस्कृतीच्या गुंफणातून का होईना सहकार्याचा पूल तयार झाला आहे. विशेष म्हणजे, सिंध सरकारने मार्गदर्शन करण्यासाठी देश-विदेशातून आमंत्रित केलेल्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांमध्ये एका ‘पुणेरी’ व्यक्तीचा समावेश होता. ही पुण्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
साधारणपणे आठ हजार वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांच्या मानवी वस्तीचे हळूहळू सिंधू संस्कृतीत रूपांतर झाले. मोहेंजोदडो व हडप्पा या उत्खननात सापडलेल्या शहरांचा काही भाग फाळणीनंतर पाकिस्तानात गेला असला तरीही ही शहरे भारतीय उपखंडाचा आणि मानवी इतिहासाचाच अविभाज्य अंग आहेत. या साइटवर अनेक संशोधने करण्यात आली. त्यामध्ये पुणे डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, खरगपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी व इतर संस्थांनी २०१६ साली केलेल्या एका नव्या संशोधनातून प्राचीन सिंधू संस्कृती ही साडेपाच हजार वर्षांपूर्र्वीची नसून, आठ हजार वर्षांपूर्वीची असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. परंतु सद्यस्थितीत जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेली मोहंजोदडो ही साइट धोक्यात सापडल्याने त्याचे संवर्धन कसे करायचे? असा यक्षप्रश्न सिंध सरकारसमोर उभा ठाकला. यासाठी सरकारने काही देश-विदेशातील पुरातत्त्वशास्त्रज्ञांची मदत घेतली, त्यामध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू वसंत शिंदे यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्या अनुभवाविषयी शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
शिंदे म्हणाले, पाकिस्तानात दोनदा जाण्याची संधी मला मिळाली. एकदा इस्लामाबाद येथे साऊथ एशियाची परिषद होती. त्यानंतर सिंध सरकारने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या ‘मोहेंजोदडो’च्या संवर्धनासाठी काय करता येईल याचे मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले होते. त्यात भारतातून निवड होणारा मी एकमेव होतो.
ं तिथे गेल्यानंतर लक्षात आले की संवर्धनासाठी सिंध सरकारकडून काही चुका झाल्या होत्या. मोहेंजोदडो जेव्हा जागतिक वारसा म्हणून घोषित झाले तेव्हा त्यांनी जे तज्ज्ञ बोलावले होते ते युरोपियन होते. युरोपियन हवामानाला अनुसरून जी पद्धत विकसित केली होती, ती पद्धतच त्यांनी या ठिकाणी वापरली. सिंधमधले वातावरण युरोपियन हवामानापेक्षा खूप वेगळे आहे. हे त्या तज्ज्ञांच्या लक्षात आले नाही. पण सिंध सरकारला दोन ते तीन वर्षांनंतर कळले की विटांचे आतून नुकसान झाले आहे आणि त्याचा भुगा होत चालला आहे. काँक्रिटवर टाकून ते दुरुस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; मात्र अधिकच नुकसान झाले.
तिथे गेल्यावर काही स्थानिक लोकांशी बोलून माहिती काढून घेतली. इथले स्थानिक लोक संवर्धनासाठी जे तंत्र वापरतात, ते वापरले तर पुढील दहा वर्षे मोहंजोदडोला धक्का लागणार नाही. मातीमध्ये सुकलेले गवत, पालापाचोळ्याचा लेप दिला तर साईटचे संवर्धन होईल, असा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले.
> दोन देशांत तणावाची स्थिती असली तरी शासकीय पाहुणा म्हणून अत्यंत सन्मानाची वागणूक मला मिळाली. भारत-पाकिस्तानची संस्कृती किंवा समस्या एकच आहेत; पण राजकीय वैमनस्यामुळे त्यावर तोडगा निघू शकत नाही. पाकिस्तानातून जाऊन आल्यानंतर सुरुवातीला मेलद्वारे संभाषण व्हायचे. मात्र आता दोन्ही देशातील संबंध खूपच बिघडल्याने त्यांच्याकडून ई-मेल येणे बंद झाले आहे
- वसंत शिंदे, कुलगुरू, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ