कचरा डेपो आल्यास मंदिराचे पावित्र्य धोक्यात

By admin | Published: May 5, 2017 02:26 AM2017-05-05T02:26:54+5:302017-05-05T02:26:54+5:30

पिंपरी सांडसला पुणे महानगरपालिकेचा कचरा डेपो होण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याने व या परिसरात

The danger of sanctity of the temple if the garbage depot comes | कचरा डेपो आल्यास मंदिराचे पावित्र्य धोक्यात

कचरा डेपो आल्यास मंदिराचे पावित्र्य धोक्यात

Next

कोरेगाव भीमा : पिंपरी सांडसला पुणे महानगरपालिकेचा कचरा डेपो होण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याने व या परिसरात ऐतिहासिक बोल्हाईमाता मंदिर असल्याने नागरिकांनी आंदोलन छेडले होते; मात्र राज्य सरकारने ग्रामस्थांचा विरोध झुगारून पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील वनखात्याची १९ हेक्टर जागा पुणे महानगरपालिकेच्या कचरा प्रकल्पासाठी देण्यास हिरवा कंदील दाखविल्याने पुण्याचा कचरा आता बोल्हाईमाता मंदिरापासून १ ते दीड किलोमीटर अंतरावर व ऐतिहासिक घाटशिळा मंदिराच्या प्रांगणात येणार आहे. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात येणार असल्याने ग्रामस्थ आता आक्रमक भूमिका घेणार आहेत.
महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध देवस्थानापैकी श्रीक्षेत्र वाडेबोल्हाई येथे बोल्हाईमाता देवीचे जागृत देवस्थान आहे.
मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी या पंचक्रोशीतील सर्व गावांनी कचरा डेपोच्याविरोधात ग्रामसभेचे ठराव दिले आहेत. त्याचे एक निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आले आहे. खासदार शिवाजीराव आढळराव व आमदार बाबूराव पाचर्णे यांनी याआधीच या संभाव्य कचरा डेपोस विरोध केला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यकारिणीने ग्रामीण भागात होत असलेल्या कचरा डेपोस कडाडून विरोध केला आहे. सध्याचा पुणे शहरात साचलेला कचरा बोल्हाईमाता मंदिराच्या प्रांगणात टाकण्याचा डाव जर पुणे महानगरपालिकेने केला तर कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या पेटवून देण्यात येतील, याची पुणे महानगरपालिकेने दखल घ्यावी.


विकास झाला नाही तरी चालेल, पण कचरा नको
कचरा डेपो आमच्या परिसरात आल्याने या ठिकाणी फुरसुंगीप्रमाणे रोगराई वाढणार आहे. त्यामुळे कचरा डेपोस विरोध करताना गावचा विकास झाला नाही तरी चालेल, पण आम्ही कचरा डेपो होऊ देणार नसल्याचे सांगत वेळप्रसंगी तीव्र आंदोलन उभे करू, असे पिंपरी सांडसच्या सरपंच सुवर्णा गजरे यांनी सांगितले.


कचरा डेपो होऊ देणार नाही
पुण्याचा कचरा पुण्यातच जिरवावा, अशी आमची भूमिका असून पिंपरी सांडसला कचरा डेपो करण्यास आमचा विरोध आहे. या ठिकाणी कचरा डेपो झाल्यास बोल्हाईमाता मंदिराचे पावित्र्य धोक्यात येणार असल्याने पुण्याचा कचरा डेपो कदापिही आमच्या भागात होऊ देणार नसून वेळप्रसंगी फुरसुंगी-उरुळीप्रमाणे आम्हीही आंदोलन उभारू.
- बाबूराव पाचर्णे, आमदार


 मुख्यमंत्र्यांनी जनतेचा अंत पाहू नये
बोल्हाईमाता मंदिराच्या पवित्र भूमीत पुण्याचा कचरा कदापिही होऊ देणार नाही. पिंपरी सांडसला कचरा डेपो होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांना यापूर्वीच सांगितले असून सरकारने जनतेवर त्यांचे निर्णय लादू नये, असे सांगतानाच शासनाने जनतेचा अंत पाहू नये; अन्यथा जनतेला वेगळा मार्ग शोधावा लागेल, असे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले.
- शिवाजीराव आढळराव, खासदार

कचरा गाड्या पेटवून देणार
पुणे शहराचा कचरा ऐतिहासिक बोल्हाईमाता मंदिराच्या प्रांगणात टाकण्याचा डाव पुणे महानगरपालिकेने केला, तर कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या कचरा गाड्या पेटवून दिल्या जातील.
- संदीप भोंडवे,
जिल्हा उपप्रमुख, शिवसेना

Web Title: The danger of sanctity of the temple if the garbage depot comes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.