धोक्याची ‘तिसरी घंटा’

By admin | Published: October 24, 2016 12:59 AM2016-10-24T00:59:22+5:302016-10-24T00:59:22+5:30

बदलती जीवनशैली, मानसिक ताण-तणाव, सततची धावपळ या गोष्टी कलाकारांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याने त्यांची जीवनरेषा धूसर होत चालल्याचे अलीकडच्या काही

Danger 'third hour' | धोक्याची ‘तिसरी घंटा’

धोक्याची ‘तिसरी घंटा’

Next

सायली जोशी-पटवर्धन, पुणे
बदलती जीवनशैली, मानसिक ताण-तणाव, सततची धावपळ या गोष्टी कलाकारांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याने त्यांची जीवनरेषा धूसर होत चालल्याचे अलीकडच्या काही घटनांमधून समोर आले आहे. त्यामुळे कलेसाठी आयुष्य झोकून देताना वारंवार मिळत असलेल्या धोक्याच्या तिसऱ्या घंटेचा इशारा लक्षात घेणेही तितकेच गरजेचे आहे.
अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांनी कला सादर करत असताना अचानक एक्झिट घेतल्याने कलाक्षेत्राबरोबरच सामान्यांनाही धक्का बसला आहे. मात्र, यानिमित्ताने सर्वसामान्यांबरोबरच कलाकारांसाठी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कलाकारांना असणारे ग्लॅमर अनेकदा दिसते. मात्र, एकाच वेळी चित्रपट, मालिका, नाटक, नृत्य, निवेदन, जाहिराती अशा सर्व आघाड्यांवर लढताना कलाकारांची दमछाक होण्याची शक्यताच
अधिक असते.
कलाकारांमध्ये आरोग्याच्या प्रश्नांमुळे गंभीर घटना घडल्याचे मागील काही दिवसांपासून दिसत आहे. नागपूरमधील रेडिओजॉकी शुभम केचे या २४ वर्षांच्या तरुणाचा नुकताच हृदयविकाराने झालेला मृत्यू हे याचेच आणखी एक उदाहरण. कलाकारांना आपली कला सादर करत असताना जीवनशैलीत अनेक बदल करणे भाग पडते. मात्र पैसा आणि प्रसिद्धीलाच अधिक प्राधान्य न देता आरोग्याकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी याविषयी बोलताना व्यक्त केले आहे.
अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागरण, वेळच्या वेळी न खाणे, प्रवास, अनेक तास काम करण्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या इतर तक्रारी ही यामागची कारणे असल्याचे दिसते. मात्र, वेळीच स्वत:कडे लक्ष न दिल्याने काही अघटित घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्र्रश्न पुन्हा उभा राहतो.
याबाबत मधुमेहतज्ज्ञ डॉ. गौरी दामले म्हणाल्या, ‘‘कलाकार अनेकदा कलंदर वृत्तीने वागतात. मधुमेह असणाऱ्या प्रत्येकानेच आणि विशेषत: कलाकारांनी योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. यामध्ये आहार, व्यायाम आणि आराम, औषधोपचार या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. नृत्यप्रकारासारखा थकवणारा कलाप्रकार असल्यास कलाकारांनी योग्य काळजी घेतली पाहिजे. काही गोष्टी ठरवून केल्यास कलाकार आपली जीवनशैली निश्चितच बदलू शकतात. आरोग्याबाबत योग्य जाण आणि गांभीर्य असायला हवे.’’

कलाकार हे त्यांच्या कुटुंबाची संपत्ती असतात तसेच ते देशाचीही संपत्ती असतात. त्यांना कोणता अपघात झाल्यास त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवार याबरोबरच देशाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे कलाकारांनी कला जोपासत असताना आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. काही होण्याआधीच योग्य ते निदान आणि उपचार करून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक कलाकाराने वयाच्या चाळिशीनंतर आरोग्याशी निगडित सर्व प्रकारच्या चाचण्या करण्याची
आवश्यकता आहे. - डॉ. रणजित जगताप, ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ


कलाकारांनी हे जपायला हवे...
कामाचा ताण असला तरीही पुरेशी विश्रांती
आवश्यक आहे.
संतुलित आहार आणि तोही वेळच्या वेळी घेणे गरजेचे.
मधुमेह, रक्तदाब किंवा इतर गंभीर आजार असल्यास योग्य ते औषधोपचार घेणे आवश्यक.
वयाच्या चाळिशीनंतर सामान्यांबरोबरच कलाकारांनीही आपली आरोग्यतपासणी करून घ्यावी.
कलाकारांनी आपल्या कलंदर वृत्तीमध्ये काही प्रमाणात बदल करून आरोग्याबाबत गांभीर्य ठेवावे.

Web Title: Danger 'third hour'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.