साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 02:01 PM2019-07-17T14:01:31+5:302019-07-17T14:08:25+5:30

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण दुष्काळाची चाहूल लागली आहे. सलग ६ व्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने जिरायती भागातील शेतकरी पूर्णत: होरपळला आहे.

danger zone to the Crop season of sugar factories | साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अडचणीत

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अडचणीत

googlenewsNext
ठळक मुद्देलांबलेला पाऊस, उसाचा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर झाल्याने परिणाम साखरेचे उत्पादन घटणार?...जिल्ह्यातील अनेक कारखाने बंद राहतील

बारामती/सोमेश्वरनगर/केडगाव/रांजणगाव सांडस : यावर्षी पडलेला दुष्काळ, लांबलेला पाऊस आणि कमी झालेले नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे नीरा खोºयातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. ऊसगाळपासह साखर उत्पादनामध्ये मोठी घट येणार असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत उघड झाले आहे. नीरा खोऱ्यात बारामती तालुक्यात सोमेश्वर, माळेगाव 
कारखाना व इंदापूर तालुक्यात छत्रपती, नीरा—भीमा, कर्मयोगी हे तीन कारखाने आहेत. सध्या या कारखान्यांच्या येणाऱ्या गळीत हंगामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 नीरा खोऱ्यातील माळेगाव या कारखान्यावर दरवर्षी ३० ते ३५ हजार एकरांवर ऊसलागवड होत असते. गेल्या वर्षी चांगला पाऊस आणि नीरा डाव्या कालव्याचे वेळेवर आवर्तन यामुळे शेतकऱ्यांनी मार्च महिन्यांपर्यंत उभे ऊस जगवले. मात्र यावर्षी पडलेला दुष्काळ आणि कालव्याचे कमी पडलेले पाणी यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस जळू लागले. त्यातच दुष्काळात तालुक्यात छावण्या सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी जळणारा ऊस छावण्यांसाठी विकला. जिरायती भागातील ऊस व एवढ्या मोठ्या प्रमाणात जाळला. तो तर छावण्यांना देण्यायोग्यही राहिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. परिणामी शेकडो एकरांवरील ऊस जळाल्याने, तसेच छावणीस विकल्याने येणाºया हंगामासाठी आता उसाची कमतरता भासणार आहे. भवानीनगर येथील श्री छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अंदाजे ३० ते ४० टक्के ऊसक्षेत्र जळाल्याची भीती व्यक्त होत आहे.
तसेच आता पावसाळा सुरू होऊनदेखील समाधानकारक पाऊस न पडल्याने साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नवीन ऊसलागवडी रखडल्या आहेत. तसेच छावण्या अजूनही सुरू असल्याने उभा ऊस छावण्यांसाठी तुटत आहे. सध्या नीरा डाव्या कालव्याला आवर्तन सुरू असून नवीन ऊस लागवडीसाठी पाटबंधारे विभागाने अजून आवर्तन सोडलेले नाही. परिणामी ७० टक्के क्षेत्रावर नवीन ऊसलागवडी झाल्या नाहीत. 

बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण दुष्काळाची चाहूल लागली आहे. सलग ६ व्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने जिरायती भागातील शेतकरी पूर्णत: होरपळला आहे. खरीप व रब्बी दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती कोणतेही पीक लागले नाही. चाराटंचाईदेखील गडद झाली आहे. तालुक्यात जनावरांसाठी प्रतिदिन ७८३ टन चाऱ्याची आवश्यकता आहे. तालुक्यात एप्रिल मेमध्ये केवळ बारामती मंडळ, वडगाव निंबाळकर मंडळ कार्यक्षेत्रात चारा उपलब्धता होती. याशिवाय माळेगाव, सुपा, मोरगाव, लोणी, उंडवडी मंडळ कार्यक्षेत्रात सध्या भीषण चाराटंचाई होती. तालुका पंचायत समितीने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात एकूण १३ हजार ३६३ पशुपालक आहेत. शिवाय तालुुक्यात ६६ गावांमध्ये तीव्र चाराटंचाई आहे. तालुक्यात लहान जनावरांची संख्या १३ हजार ४६४, तर मोठ्या जनावरांची संख्या ४६ हजार ६३२ आहे. एकूण ६० हजार ९० जनावरे तालुक्यात आहेत. ८५ हजार ६४७ शेळ्या-मेंढ्या आहेत. मोठ्या जनावरांना प्रतिदिन १५ किलो चारा, लहान जनावरांना ७ किलो प्रतिदिन चाºयाची गरज भासते. या हिशेबानुसार जवळपास ७८२.५१३ टन चाऱ्याची जनावरांना गरज लक्षात घेता चाºयासाठी तुटून गेलेल्या उसाचे चित्र स्पष्ट होते.
 जिरायती भागातील ८० टक्के शेतकरी दूधव्यवसाय करतात. शेतीला पूरक असणारा हा व्यवसाय जिरायती भागात मात्र शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय झाला आहे. दिवाळीच्या काळात बागायती पट्ट्यातून येणाऱ्या उसाला ३ हजार ५०० ते ४ हजार टन दराने शेतकऱ्यांनी ऊस आणला. शेतात काही पिकलेच नसल्याने जनावरांना चारा विकत घ्यावा लागत आहे. मात्र, केवळ जनावरे जगविण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना चारा विकत घेण्याची गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वेळ आली आहे. जिरायती भागात शेतकऱ्यांनी टनाला ४ हजार रुपये मोजून सोमेश्वरनगर, पाटस, वरवंड, माळेगाव तसेच इंदापूरच्या भिगवण परिसरातून ऊस खरेदी करून जनावरांची भूक भागविली. त्यामुळे बारामती आणि इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात  जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस तुटून गेला. त्याचा साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर विपरीत  परिणाम होणार आहे. सध्या तालुक्यात सहकारी साखर कारखाना आणि साखर कारखान्यांसह काही संस्थांच्यावतीने चारा छावण्या सुरू आहेत. त्यामुळे  पाऊस लांबूनदेखील चाराटंचाईची झळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. चारा छावण्यांसाठी ऊस मोठ्या प्रमाणात तुटून जात आहे. पाऊस लांबल्याने ऊस जळून जाण्यापेक्षा चारा म्हणून विक्री केलेला बरा, या मानसिकतेतून उसाची विक्री केली जात आहे.
.........
नीरा डाव्या कालव्यावरील उसशेती,साखर कारखानदारी अडचणीत
बारामती, इंदापूरला नीरा-देवघर प्रकल्पातून मिळणारे ६० टक्के पाणी भाजप खासदारांच्या मागणीनंतर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ऊस जगविण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन मिळणार नाही. कालव्याच्या पाण्याशिवाय ऊस जगविणार तरी कसा, असा प्रश्न ऊसउत्पादक शेतकºयांसमोर ‘आ’ वासून उभा आहे. अनेक शेतकरी ऊसलागवड टाळण्याच्या मन:स्थितीत आहेत. 
......
नीरा-देवघरचे पाणी बंद झाल्याने ऊसलागवड करावी का, असे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील आर्थिक उलाढालीचा मुख्य स्रोत असणारी साखर कारखानदारी नीरा डाव्या आणि नीरा उजव्या काळव्याच्या करारानुसार आता नीरा डाव्या कालव्याला ४० व नीरा उजव्या कालव्याला ६०  टक्के पाणी मिळाले आहे. यामुळे आता भविष्यात ही नीरा डाव्या कालव्यावरील ऊसशेती आणि साखर कारखानदारी पूर्णपणे अडचणीत सापडली आहे.
...........
मागील दोन वर्षातील सर्वात नीचांकी घट 
सोोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की यंदा लांबलेल्या पावसाबरोबर नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन लांबले आहे. त्यामुळे येणाऱ्या गळीत हंगामात दोन लाख टन उसाची घट होण्याची शक्यता आहे. तसेच आडसाली लागवडीमध्ये निम्म्याने घट झाली आहे. ही मागील दोन वर्षांतील सर्वात नीचांकी घट आहे.
..........
गळीत हंगामाचे लक्ष्य घटले कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की सध्याची परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या गळीत हंगामात आपले लक्ष्य १२ लाख टन ऊस गाळपाचे होते. ते आता अंदाजे १० लाखांपर्यंत आले आहे. 
.....

मागील दोन दिवसांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडून आम्ही पुनर्नोंदणी अहवाल मागविला आहे. त्यानुसार आम्हाला नेमका गळीत हंगामावर किती परिणाम होणार आहे, तो स्पष्ट होईल. त्याबाबतची माहिती आम्ही २ दिवसांत देऊ.
.........
...जिल्ह्यातील अनेक कारखाने बंद राहतील
माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की यावर्षी दुष्काळाच्या झळा संपूर्ण राज्याला सोसाव्या लागल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील तसेच नगर, पुणे जिल्ह्यातील अनेक कारखाने बंद राहतील. सध्या माळेगाव कारखान्याकडे ५.३६ लाख टन उपलब्ध आहे. गेटकेनसाठी आम्ही जोर लावणार आहे. त्यासाठी यंत्रणा शेजारील तालुक्यातून फिरत आहे.

Web Title: danger zone to the Crop season of sugar factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.