धोकादायक! लॉकडाऊनमध्ये दारू सुटली ,पण नशेसाठी औषधी गोळ्यांचा सर्रास वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 11:21 AM2020-08-20T11:21:30+5:302020-08-20T11:22:23+5:30
मद्य विक्री बंद असल्याने अनेकांनी आपला मोर्चा औषधी गोळ्यांकडे वळविला..
विवेक भुसे
पुणे : लॉकडाऊनच्या काळात दारु मिळू शकत नसल्याने अनेक जण अस्वस्थ होत होते. त्यातूनच त्यांना पोटात मुरडा आल्यासारखे वाटत होते. त्यावर उपाय म्हणून ते एक गोळी घेत. लॉकडाऊनमुळे अनेकांची दारु सुटली पण त्याचवेळी नशेसाठी आता ते अशा गोळ्यांचा वापर करु लागल्याचे वास्तव समोर येऊ लागले आहे. या गोळ्यांचे साईड इफेक्ट खूप असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असून आपल्या घरातील तरुण मुले अशा गोळ्याच्या व्यसनांच्या आहारी गेले नाहीत ना, याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (याचा गैरवापर होऊ नये, म्हणून जाणीवपूवर्क गोळीचे नाव येथे देण्यात आलेले नाही.)
महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान पोटदुखीचा त्रास होतो. ही पोटदुखी कमी करण्यासाठी एक गोळी डॉक्टरांकडून दिली जाते. तसेच पोटदुखीसाठी अनेकदा ही गोळी दिली जाते. मात्र, आता त्याचा वापर नशेसाठी केला जाऊ लागला आहे.अनेक तरुण एकावेळी ५ ते ६ गोळ्या घेत असल्याचे दिसून आले आहे.अनेक वस्त्यांमध्ये हे लोण पसरले असल्याचे मेडिकल स्टोअर्समध्ये केलेल्या चौकशीत आढळून आले असून त्यांच्याकडे या गोळ्यांचा खपात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक तरुण आपल्या येथे येऊन एकावेळी ४ - ५ गोळ्या खावुन त्यावर पाणी पितात. चहा पिताना दिसून येत असल्याचे एका चहा विक्रेत्याने सांगितले.
याबाबत एका मेडिकल स्टोअर्स व्रिकेत्याने सांगितले की, या गोळ्या अनेक जण पोट दुखत असल्याचे सांगून घेण्यासाठी येतात़ काही जण आपली बहिण, आईला पाठवितात. ही गोळी कॅटगरीतील नसल्याने डॉक्टरांचे प्रिस्क्रीपशन नसले तरी आम्ही देतो. याशिवाय स्वप्त असल्याने अनेक जण १० गोळ्यांची अख्खी स्ट्रिप घेऊन जातात. गेल्या काही महिन्यात या गोळ्यांची मागणी अचानक वाढल्याचे जाणवले. विशेषत: वडारवाडी व इतर वस्त्यांमधील लोकांकडून गोळ्यांची मागणी वाढल्याचे जाणवले आहे. त्यामुळे आता कोणी गोळी मागितली तर आम्ही एक किंवा दोनच गोळ्या देतो.
अशाच प्रकारे इतर काही मेडिकल स्टोअर्समध्ये चौकशी केल्यावर त्यातील एकाने अगोदर किती पाहिजे असे विचारुन १० गोळ्या देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर बातमीदाराने आपली ओळख सांगून चौकशी केल्यावर आम्ही एकावेळी दोन, तीन गोळ्याच देतो, असे सांगितले. दुसऱ्य मेडिकल स्टोअर्सने आता आम्ही या गोळ्या ठेवत नसल्याचे सांगितले. अनेक ठिकाणी ओळखीच्या लोकांनाच या गोळ्या दिल्या जात असल्याचे सांगितले जाते.
याबाबत डॉक्टर जयंत जोशी यांनी सांगितले की, पोटात मुरडा आल्यावर ही गोळी दिली जाते. तिचा इफेक्ट हा सुमारे दीड तास इतका असतो. त्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर दिवसातून तीन वेळा एक गोळी घेण्यास सांगितले जाते.मात्र, एकाच वेळी पाच, सहा गोळ्या कधीही घेऊ नये.
या गोळ्यांचे साईड इफेक्ट खूप आहेत. या गोळ्या सातत्याने घेतल्यास नर्व्हसनेस येतो. या गोळ्या घेतल्यानंतर गाडी अथवा अवजड यंत्रसाम्रुगी चालवू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.अल्कोहोलबरोबर या गोळ्या घेतल्या तर आणखी जास्त परिणाम होतो.या गोळ्या सातत्याने घेतल्यास दृष्टी अंधूक होऊ शकते. आकलन करण्याची क्षमता कमी होते़ घाम तयार होण्याच्या यंत्रणेत अडथळा येतो. त्यामुळे श्रमिक व कामगार वर्गाला उन्हाळ्यात घाम कमी आला तर त्यांच्या शरीराचे तापमान थंड ठेवण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. या गोळ्यांमुळे शॉटटर्म मेमरी लॉस होत असल्याचे या गोळ्यांच्या माहितीमध्ये नमूद केले असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.
त्यामुळे आपला मुलगा अथवा जवळचे कोणी या गोळ्या घेत असल्यास पालकांनी सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.