घाटरस्ते बनतायेत धोकादायक
By admin | Published: August 8, 2016 01:29 AM2016-08-08T01:29:38+5:302016-08-08T01:29:38+5:30
वरंधघाट व आंबडखिंड घाटात, भोर-पसुरे-पांगारी रस्ता, नीरा देवघर धरणभागातील रिंगरोड, भाटघर धरण भागातील रस्त्यांवर वारंवार डोंगरातील दगड
भोर : वरंधघाट व आंबडखिंड घाटात, भोर-पसुरे-पांगारी रस्ता, नीरा देवघर धरणभागातील रिंगरोड, भाटघर धरण भागातील रस्त्यांवर वारंवार डोंगरातील दगड, मातीच्या दरडी पडून घाट बंद होत आहेत. रस्त्याला भेगा पडून रस्ता खचत आहे. यामुळे तालुक्यातून जाणारे घाटरस्ते आणि राज्यमार्ग व जिल्हा मार्गांची दुरवस्था झाली आहे. घाटरस्ते धोकादायक झाले आहेत. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्याची आपत्कालीन व्यवस्था संथ गतीने काम करीत आहे. ती फक्त कागदावरच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
महाड-पंढरपूर मार्गावरील हिर्डोशी गावाजवळ रात्रीच्या वेळी दरड कोसळल्याने भोरवरून महाडकडे सिमेंटने भरलेला एक ट्रक, दोन एसटी बस, बोलेरो,भाजीपाल्याचा टेंपो व एक कंटेनर रोडवर पडलेल्या दरडीच्या चिखलमातीत अडकून बसल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. जीवितहानी झाली नाही. त्यामुळे महाड बाजूकडून येणारी संपूर्ण वाहतूक धारमंडप पांगरी-पसुरे मार्गे वळवण्यात आली होती. दुपारी ४ ते रात्री ३ वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन जे.सी.बी.च्या मदतीने रस्त्यावरील दरड काढण्याचे काम सुरु होते. दुसऱ्या दिवशी रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला होता.
महाबळेश्वरला जाणा-या पर्यटाकांचा मार्ग...
नीरा देवघर धरण, निसर्गरम्य परिसर, डोंगरातून पडणारे धबधबे, वेडीवाकडी वळणे घेत जाणारा वरंध घाट तर आंबड खिंड घाटातून पडणारे धबधबे, डोंगरावरून दिसणारे मनमोहक दृश्य, मांढरदेवीला जाणारे भाविक व पाचगणी, महाबळेश्वरला जाणारे अनेक पर्यटक याच मार्गाचा वापर करतात. मात्र या रस्त्यावरील डोंगर कमकुवत झाल्याने वारंवार दरड पडत आहे.
रस्ता खचत असून वाहतूक ठप्प होत आहे. यामुळे या दोन्ही घाटांतील वाहतूक धोकादायक झाल्याने घाटात वाहने थांबविण्यास विरोध होत आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
ती फक्त कागदावरच असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
खानापूर गावठाणाच्या ओढ्यावरील पुलाला पडले भगदाड
नेरे : खानापूर (ता़ भोर) येथील गावठाणात जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाला पुराच्या पाण्याने भगदाड पडले आहे. पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पूल वाहून जाण्याची शक्यता आहे़
सलग चार दिवस वीसगाव खोऱ्यात मुसळधार पावसाने थैमान मांडले आहे़ खानापूर परिसरात वीसगाव खोऱ्यातील चार ओढ्यांचे पाणी एकत्र येऊन खानापूर येथील ओढ्याला मिळते.
खानापूर गावाजवळच मोठा ओढा असून या ओढ्यावर चार ते पाच फूट उंचीचा पूल बांधण्यात आला आहे़ मात्र या पुलाची उंची कमी असून काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा
चालू आहे़
दरवर्षी परिसरातील चार ओढ्यांचे पाणी एकत्र येऊन या खानापूर गावच्या पुलावरून जात असते. यामुळे पुलाला भगदाड पडणे, पुलाच्या खालील भराव वाहून जाण्याने हा पूल धोक्याचा बनत चालला आहे़