कवडीपाट टोलनाक्यावरील धोकादायक केबीन रस्त्यात आडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:15+5:302021-03-23T04:11:15+5:30
----- कदमवाकवस्ती : सोलापूर-पुणे महामार्गावरील कवडीपाट येथील धोकादायक केबीन वाहनाच्या धडकेने रस्त्यावरच आडवे झाले, त्यामुळे टोलनाक्यावरील एक लेन काही ...
-----
कदमवाकवस्ती : सोलापूर-पुणे महामार्गावरील कवडीपाट येथील धोकादायक केबीन वाहनाच्या धडकेने रस्त्यावरच आडवे झाले, त्यामुळे टोलनाक्यावरील एक लेन काही तासांसाठी ठप्प झाली, विशेष म्हणजे, या धोकादायक केबीनचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात प्रकाशित केले होते, तरी प्रशासनाला त्याचे गांभीर्य कळाले नाही व रविवारीच ही केबीन रस्त्यावर अक्षरश: आडवी पडली, सुदैवाने यामध्ये जीवित व कुठल्या वाहनांची आर्थिक हानी झाली नाही.
सोलापूर-पुणे महामाहार्गावर कवडीपाट येथे पूर्वी टोल नाका उभा करण्यात आला होता. टोलनाक्याची मुदत संपल्यावर तो बंद झाला मात्र टोलवसुलीसाठी रसत्याच्या मधोमध उभी करण्यात आलेले केबीन मात्र जसेच्या तसे राहिले. वर्षानुवर्षे त्या केबीनची देखरेख नव्हती त्यामुळे केबीनचा पत्रा गंजला व केबीन एका बाजूल कलले होते. त्यामुळे ती केबीन वाहन जवळून गेल्यानेही हादऱ्याने पडेल की काय अशी भीती निर्माण झाली होती. बंद टोल नाक्यावरील या धोकादायक केबीनबद्दल प्रशासन अनभिज्ञ नव्हतेच, अनेक अधिकारी या ठिकाणाहून प्रवास करताना त्यांच्या नजरेतही त्या धोकादायक केबीनचे वास्तव समोर आले होते आणि नागरिकांनीही केबीन काढून टाकण्याची मागणी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे केली होती मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले अखेर ती केबीन आज कोसळली.
कवडीपाट टोलनाक्यावर धोकादायक असलेले केबिनचे वृत्त ‘ लोकमत’ काही महिन्यांपूर्वीही प्रकाशित केले होते. मात्र त्याचे गांभीर्य प्रशासनाला लक्षात आलेच नाही. त्यामुळे त्या धोकादायक केबीनच्या बातमीचा पाठपुरावा लोकमतने सुरूच ठेवला व रविवारी पुन्हा सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. मात्र त्यानंतरही प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही आणि रविवारीच एका वाहनाच्या धडकेत ही केबीन रस्त्यावर कोसळली. ही बातमी व त्याचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. काही जणांनी शासकीय अधिकारी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (NHAI) अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही हा फोटो व बातमी पाठवून दिला मात्र तरीदेखील ढिम्म प्रशासनाने ही रस्त्याच्या मधोमध पडलेली केबीन काढून बाजूला काढली नाही. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली अखेर ग्रामपंचायतीनेच काही ग्रामस्थांना मदतीला घेऊन रस्त्यावरील ही केबीन रस्त्याच्या कडेला घेतली व वाहतूक सुरळीत केली. ग्रामपंचायतीने हे औदार्य दाखविले नसते तर महामार्गावरून भरधाव येणाऱ्या गाड्या या केबीनला धडकल्या असत्या व मोठ्या अपघाची शक्यता होती.
--
बंद टोल नाक्याचा वापर जाहिरातीसाठी
टोल नाका बंद झाला तरी येथील बंद टोलनाक्याचा वापर फक्त वाढदिवसाच्या व प्लॉटिंगच्या जाहिराती पुरता होत असून याठिकाणी या केबीनमुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून कदमवाकवस्ती गावाच्या सुरुवातीला घाणीच्या ठिकाणावरून प्रवेश होत असल्याने स्थानिक नागरिक नाराज होत आहेत. लवकरात लवकर हा बंद टोल नाका हटवून रस्ता मोकळा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
--
उर्वरित केबीन काढण्याची तत्परता दाखवावी
--
टोल नाक्यावरील एक केबीन पडली आहे उर्वरित इतक केबीन, पत्र्याचे शेड व रस्त्याची विभागणी करणारे खांब, गतिरोधक आदी बाबी मात्र जसेच्या तसे आहेत. टोलनाका नाहीच त्यामुळे इतर विनाकारण रस्त्यावर टोलनाक्याचे बांधकाम व साहित्य पडून आहेत त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होत असून वाहनांचा वेग विनाकारण मंदावला जातो. त्यामुळे गंभीर अपघाताची वाट न पाहता प्रशासनाने उर्वरित केबीनसह हे बांधकाम काढून टाकावे अशी विनंती ग्रामस्थ व प्रवाशांनी केली आहे.
---
फोटो क्रमांक : २२कदमवाकवस्ती टोल नाका फोटो
फोटो ओळ : पुणे सोलापूर महामार्गावर धोकादायक रित्या पडलेले केबिन.