नांदुरकीचीवाडी येथील धोकादायक फ्यूजबॉक्स तातडीने बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:14 AM2021-06-16T04:14:40+5:302021-06-16T04:14:40+5:30
महावितरणच्या अजब कारभारामुळे आंबेगाव तालुक्यातील आदिवासी जनता कंटाळली आहे. वाढीव व चुकीच्या येणाऱ्या बिलांमुळे या भागातील जनता त्रस्त ...
महावितरणच्या अजब कारभारामुळे आंबेगाव तालुक्यातील आदिवासी जनता कंटाळली आहे. वाढीव व चुकीच्या येणाऱ्या बिलांमुळे या भागातील जनता त्रस्त झाली असून, दर महिन्याला बिलाच्या येणाऱ्या भरमसाठ रकमा भरून आदिवासी जनता मेटाकुटीस आली आहे. एकीकडे भरमसाठ बिले तर दुसरीकडे उघडे फ्युजबॉक्स, लोंबकळत्या तारा, धोकादायक पोल ही आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील स्थिती आहे.
उघडे फ्युजबॉक्स, लोंबकळत्या तारा यामुळे आदिवासी भागात धोकादायक स्थिती निर्माण झाली असून, महावितरणने सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी सुरू असणारा खेळ थांबविला नाही तर तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती आंबेगाव तालुका आदिवासी जनतेच्या वतीने देण्यात आली आहे.
तालुक्याच्या आदिवासी भागातील जांभोरी गावच्या नांदुरकीचीवाडी, लिंबोणीचीवाडी येथील फ्यूजबॉक्सची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. ग्रामस्थ व जनावरांना धोका निर्माण झाला होता. अशीच स्थिती या भागातील अनेक गावच्या फ्यूजबॉक्सची अजूनही आहे.
फ्यूजबॉक्स बसविते या वेळी लाईनमन किशोर खासदार, नवनाथ केंगले, जांभोरीचे पोलीस पाटील वसंत गिरंगे, नितीन सरोदे, अरुण केंगले, प्रकाश केंगले, दत्ता गिरंगे, सुभाष हिले व जांभोरी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र पावसाळ्यातील धोकादायक स्थिती पासून दूर राहावयाचे झाल्यास तालुक्याच्या आदिवासी भागातील इतर गावांतील फ्यूजबॉक्सही तातडीने बदलण्याची आवश्यकता आहे.
--
सोबत- १४डिंभे लोंबकळत्या तारा व उघड्या फ्यूजबॉक्स
--
ओळी- आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील जांभोर, नांदूरकीचीवाडी येथील फ्यूजबॉक्सची बदलताना कर्मचारी.