विद्यार्थ्यांसह नागरिकांचा बॅकवॉटरमधून धोकादायक प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 06:52 PM2019-11-20T18:52:29+5:302019-11-20T18:54:12+5:30
होडीतुन धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याने भीतीचे वातावरण
शिक्रापूर : खेड व शिरूर तालुक्याला जोडणाऱ्या तीन वाड्या वस्त्यांमधील विद्यार्थी व नागरिकांना थिटेवाडी बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमधून होडीतून प्रवास करुन शाळा किंवा कामाच्या ठिकाणी जावे लागत आहे. जिल्हा परिषदेने दिलेल्या होडीतुन धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याने भीतीचे वातावरण आहे.
सुमारे पाचशे लोकवस्ती असलेल्या जालिंदर नगर, मुक्ताईनगर ,शेरेवस्ती येथील सुमारे ४० विद्यार्थ्यांना पाबळ येथे शाळेसाठी यावे लागते. नागरिकांना रोजची कामे व शेतीची कामांसाठी थिटेवाडी बंधाऱ्यातून होडी द्वारे धोकादायक प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा जलपर्णीमध्ये बोट अडकल्याने तासन्तास विद्यार्थ्यांना व नागरिकांना भर पाण्यात थांबावे लागते. बोट ओढण्यासाठी लावलेला दोर देखील धोकादायक पद्धतीने तुटण्याची शक्यता असते.
मागील दहा पंधरा दिवसापूर्वी झोडकवाडी किनाºयावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या होडीमधून एक लहान मुलगी पाण्यात पडली होती. मोठ्या प्रयत्नानंतर इतर विद्यार्थ्यांनी तिला बाहेर काढले होते. होडीतून प्रवास करताना दोर तुटण्याच्या शक्यतेमुळेही भीती वाटत असल्याचे अनेक मुलींनी सांगितले आहे. याठिकाणी कठडे नसल्याने बोटीतून उतरतांना मोठी कसरत करावी लागते. साधारण २० ते ३० फूट खोल असलेल्या पाण्यात प्रवास करताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करावा लागत आहे. होडीला प्रशिक्षित नावाडी देखील नसल्याने अनेक वेळा स्थानिक नागरिक अथवा विद्यार्थी स्वत: होडी घेऊन प्रवास करतात. अनेक आंदोलनानंतर थिटेवाडी बंधारा पूर्ण झाला, भागातील पाणीप्रश्न मिटला.मात्र येथील अनेक समस्या आजही प्रकर्षाने जाणवत आहेत. प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे. बंधाऱ्यावर पूल बांधण्याची मागणी होत असून खेडच्या भागात असलेल्या परंतु रोज पाबळला जाणाऱ्या लोकांसाठी समस्या निर्माण झाली आहे.
केंदूर मुक्ताईनगर कनेरसर झोडकवाडी या साडेतीन किलोमीटर अंतरासाठी सव्वातीन कोटी च्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच या ठिकाणी एक पुल देखील मंजूर केला असल्याचे राजकीय मंडळीन कडून सांगण्यात येत असून हे काम लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.