दुतर्फा पार्किंगमुळे धोका , दुतर्फा पार्किंगमुळे धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 04:10 AM2018-01-29T04:10:36+5:302018-01-29T04:10:51+5:30
रुंदीकरण झालेल्या मार्गावरील काही प्रमुख रस्त्यावर क्रांतिसूर्य महात्मा फुले (तीन हत्ती) चौकातील बेकायदेशीर पार्किंगवर होत असलेली वाहतूक पोलिसांची कारवाई थंडावल्याने तळजाईकडे जाणाºया प्रशस्त डीपी रस्त्यावर वाहने लावण्यास सुरुवात केल्यामुळे हा डीपी रस्ता अपघात चक्रात अडकण्याच्या मार्गावर आहे.
धनकवडी : रुंदीकरण झालेल्या मार्गावरील काही प्रमुख रस्त्यावर क्रांतिसूर्य महात्मा फुले (तीन हत्ती) चौकातील बेकायदेशीर पार्किंगवर होत असलेली वाहतूक पोलिसांची कारवाई थंडावल्याने तळजाईकडे जाणाºया प्रशस्त डीपी रस्त्यावर वाहने लावण्यास सुरुवात केल्यामुळे हा डीपी रस्ता अपघात चक्रात अडकण्याच्या मार्गावर आहे.
क्रांतिसूर्य महात्मा फुले (तीन हत्ती) चौक, संभाजीनगर, कानिफनाथ चौक ते त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ परिसर विस्तारीत रस्ता, धनकवडी रस्ता या मार्गाकडेला सातत्याने होणारे बेकायदा पार्किंग, पर्यायाने होणारी वाहतूककोंडी, धोकादायक स्थिती आणि अपघात याबाबत नागरिकांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्तांपर्यंत पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलिसांनी बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता जॅमर लावून अनेक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली होती.
याबाबत स्थानिक नागरिकांनी बेकायदा पार्किंग, बेवारस वाहने त्यामुळे होणारे अपघात आणि वाहतूककोंडी या समस्यांचा पाढा वाहतूक शाखेच्या उपायुक्तांसमोर वाचला होता. परंतु कारवाई थंडावल्याने पुन्हा वाहनचालकांनी डीपी रस्त्याकडे आपला मोर्चा वळवला.
धनकवडी स्मशानभूमी ते तळजाई शेवटचा बसथांबा या अर्धा किमीच्या अंतरावर दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट बस, स्कूल व्हॅन, ट्रक, टेम्पो, मोटारी यांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. दुतर्फा पार्किंगमुळे ६० फुटी रस्ता आकसला जाऊन केवळ १५-२० फुटच रस्ता वाहतुकीसाठी शिल्लक राहिला आहे. पादचाºयांनासुद्धा या वाहतुकीतून धोकादायक पद्धतीने मार्गस्थ व्हावे लागत आहे. या मार्गावरील महापालिकेच्या शाळेत जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
धोकादायक स्थितीचा सामना
किती दिवस हा त्रास आम्ही सहन करायचा ज्येष्ठ नागरिक, पादचारी, महिला, शालेय विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी यांना सातत्याने धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा होणाºया बेकायदा पार्किंगमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भानुदास पायगुडे यांनी दिला.