पोलिसांनीच बुजविले पुणे-नगर महामार्गावरील धोकादायक खड्डे; प्रशासनाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 12:01 PM2021-10-01T12:01:25+5:302021-10-01T12:07:32+5:30
पुणे-नगर महामार्गावर काही ठिकाणी रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडल्याने अनेक दुचाक्यांचे अपघात होऊन अनेकांना इजा झाल्याचे निदर्शनास येत होते
कोरेगाव भीमा (पुणे): प्रत्येक तालुक्यात विविध कामासांठी वेगवेगळे विभाग असताना कोणत्याही विभागाचे काम असेल तरी त्याचा ताण पोलिसांवरच येत असतो. त्यामुळे खाकीकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन खूप वेगळा असताना अनेकदा खाकीतील माणुसकीचे दर्शन देखील नागरिकांना होत असते. मात्र अशाच एका आगळ्यावेगळ्या सामाजिक कार्यामुळे शिक्रापुरातील पोलिसांच्या खाकी पलीकडील माणुसकीचा प्रत्यय नागरिकांना आला असून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
पुणे-नगर महामार्गावर काही ठिकाणी रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडल्याने अनेक दुचाक्यांचे अपघात होऊन अनेकांना इजा झाल्याचे निदर्शनास येत होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा विनंती करूनही रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नगरिकांची या खड्यातून मुक्तता करण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी मिलिंद देवरे, गणेश शेंडे, ट्राफिक वार्डन किरण थोरात, बाळकृष्ण शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यावरील धोकादायक खड्डा बुजविण्याचा निर्णय घेत स्वतः सिमेंट मिश्रित वाळू व खडी त्या ठिकाणी आणून हातामध्ये फावडे खड्ड्यात भर टाकून खड्डा बुजविला.
दरम्यान येथे खाकी कपड्यांवरील पोलीस हातात फावडे घेऊन खड्डा बुजवित असल्याचे पाहून नागरिक व प्रवाशांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. तर अनेकांनी वाहने थांबवून पोलिसांच्या कार्याबद्दल पोलिसांचे आभार मानले. तर यावेळी बोलताना येथील खड्ड्यामध्ये अनेक दुचाकी चालक घसरून पडल्याचे निदर्शनास आल्याने आम्ही सामाजिक भावनेतून खड्डा बुजविला असल्याचे पोलीस नाईक मिलिंद देवरे यांनी सांगितले.
रस्ता कोणाचा अन् दुरुस्तीचा ताण कोनावर?
पुणे-नगर महामार्गाची दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना हा विभाग मात्र जाणीवपूर्वक रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली कानाडोळा करताना दिसत असते. पुणे नगर महामार्गावरून अनेक विभागाचे अधिकारी प्रवास करत असतात. मात्र पोलिसांना खड्ड्यातील अपघातांची दया आल्याने त्यांनी पुढाकार घेत खड्डे बुजविले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना येथील खड्डे दिसत नाही का, असा सवाल नागरिक करत असताना रस्ता कोणाचा अन् दुरुस्तीचा ताण कोणावर असा सवाल उपस्थित होत आहे.
आमच्या कामापेक्षा नागरिकांचा जीव महत्त्वाचा-
खड्डे बुजविण्याचे आमचे काम नाही ही वस्तुस्थिती असताना आमच्या कामापेक्षा आम्हाला नागरिकांचा जीव महत्त्वाचा असल्याने पोलिसांनी माणुसकीच्या नात्याने याआधीही महामार्गावरील खड्डे बुजवले असल्याचे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.