भोर तालुक्यातील धोकादायक गावांकडे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:17 AM2018-06-14T02:17:21+5:302018-06-14T02:17:21+5:30

भोर तालुक्यातील चार गावे धोकादायक असून, त्याचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे. सदरच्या धोकादायक गावांना भविष्यात धोका होऊ नये, म्हणून कामासाठी सुमारे १ कोटीचा निधी मंजूर आहे; मात्र प्रशासनाच्या कारभारात पावसाळा आला, तरी अद्याप कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या गावात दरड कोसळून पुन्हा धोका निर्माण होण्याचा संभव आहे.

dangerous villages in Bhor taluka | भोर तालुक्यातील धोकादायक गावांकडे दुर्लक्षच

भोर तालुक्यातील धोकादायक गावांकडे दुर्लक्षच

googlenewsNext

भोर - तालुक्यातील चार गावे धोकादायक असून, त्याचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे. सदरच्या धोकादायक गावांना भविष्यात धोका होऊ नये, म्हणून कामासाठी सुमारे १ कोटीचा निधी मंजूर आहे; मात्र प्रशासनाच्या कारभारात पावसाळा आला, तरी अद्याप कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या गावात दरड कोसळून पुन्हा धोका निर्माण होण्याचा संभव आहे.
तालुक्यातील डोंगर उतारावर असलेली घरे, वाड्या-वस्त्यांना धोका होऊ शकतो. त्यात खालची धानवली, डेहेणे, सोनारवाडी (पांगारी) जांभुळवाडी (कोर्ले) या डोंगरात असणाऱ्या गावात दरडी कोसळून धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मार्फत पाहणी करून सदरची गावे धोकादायक म्हणून जाहीर केली असून, या गावात उपाय सुचविण्यासाठी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यात आली होती. तसा अहवाल प्रशासनाला दिला असून, धोकादायक गावातील कामांसाठी सुमारे एक कोटी रुपये निधी मंजूर आहे; मात्र पावसाळा सुरू झाला, तरी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो.
भोर तालुक्यातील डेहणे, सोनारवाडी, जांभुळवाडी, धानवली खालची ही गावे वनक्षेत्रात येत आहेत. त्यामुळे सदर गावातील मंजूर कामे वनविभागाच्या परवानगीशिवाय करता येत नाहीत. त्यामुळे सदरची कामे वनविभागाने करायची की सार्वजनिक बांधकाम विभागाने, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. प्रशासनाच्या खेळात पावसाळा आला, तरी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे यावर्षी कामे होतील की नाही, याबाबत शंका आहे. रायरेश्वर किल्ल्याच्या डोंगराला लागूनच वरची धानवली म्हणून ८ ते १० घरांची ५० ते ६० लोकांची वस्ती फार पूर्वीपासूनच आहे. डोंगरात असल्याने धोकादायक गाव म्हणून शासनाने घोषित केल्यामुळे वरच्या धानवली गावाचे १९९२ मध्ये डोंगरातून सपाटाला पुनर्वसन करण्यात आले आहे. सुमारे ५० कुटुंबे राहतात. खालची धानवलीला जायचे झाल्यास भोरपासून २२ किलोमीटरवर असलेल्या कंकवाडी गावावरून ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करून डोंगर चढून जावे लागते, कायमस्वरूपी रस्ता नाही. गावात समाज मंदिर नाही, शाळेची इमारत खराब असून दर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे आशा मुकुंद धानवले व भिकू नारायण धानवले यांनी सांगितले. रायरेश्वर गडाकडे जाताना कोर्ले गावांतर्गत जांभुळवाडी असून ही वाडीही धोकादायक आहे, तर भाटघर धरण भागातील डेहेण व सोनारवाडी ही दोन गावेही धोकादायक घोषित केली आहेत; मात्र कामे सुरू नाहीत.

पाऊस झाल्यास दरडी कोसळण्याचा धोका
पुणे जिल्ह्यातील २३ पैकी १६ गावांत कामे सुरू झाली आहेत; मात्र भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील गावे वनविभागाच्या क्षेत्रात येत असल्याने या गावातील कामे अद्याप सुरू झालेली नाही. ही कामे त्वरित सुरू करावी; अन्यथा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास दरडी कोसळण्याचा धोका आहे, असे धानवलीच्या उपसरपंच उषा रामचंद्र धानवले व डेहेणेचे सरपंच संदीप दुरकर यांनी सांगितले.

या गावांसाठी मंजूर निधी
धानवली ५0 लाख
डेहेणे २५ लाख
सोनारवाडी १६ लाख
जांभुळवाडी ८ लाख

Web Title: dangerous villages in Bhor taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.